भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राहील का हीच शंका आहे; गोपीचंद पडळकरांचा घणाघात
राजकारण

भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राहील का हीच शंका आहे; गोपीचंद पडळकरांचा घणाघात

सांगली : ”जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदाचं सोडाच, भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राहील का हीच शंका आहे,’ असा घणाघात भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना लगावला आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवल्यानंतर सुरू झालेली चर्चा थांबायचे नावच घेत नाही. या मुद्द्यावर आता गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवरही तोफ डागली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पडळकर हे बेधडक मतं मांडण्यासाठी ओळखले जातात. जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेबाबत बोलताना त्यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. सांगली इथं ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. ते म्हणाले, ”जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदाचं सोडाच, भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राहील का हीच शंका आहे. मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न बघायला हरकत नाही. मात्र, १९९० पासून जयंत पाटील राजकारणात करताहेत. एवढ्या वर्षात केलेलं एक मोठं काम किंवा प्रकल्प ते सांगू शकत नाहीत. जिल्ह्यासाठी येईल ते सगळं मतदारसंघात न्यायचं एवढंच ते काम करतात. मग राज्याची अवस्था काय होईल याचा विचार करा,’ असंही पडळकर यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले की, ”जयंत पाटील हे अनावधानानं राजकारणात आलेलं पात्र आहे. राजाराम बापूंच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर त्यांना राजकारणात संधी मिळालीय. अनुकंपा तत्वावर भरती करताना गुणवत्ता तपासली जात नाही. पाटील यांची गुणवत्ता नसताना लोकांनी त्यांना भरभरून दिलंय. पण ते स्वत:च्या जिल्ह्यातही काही करू शकले नाहीत.’ ‘असा टोला पडळकर यांनी हाणला. ‘जयंत पाटील हे फार बुद्धिमान आहेत असा त्यांचा व त्यांच्या पक्षाचा समज आहे. मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना ‘युनो’मध्ये पाठवण्याचा विचार करायला हवा,’ असं पडळकर म्हणाले.