जयंत पाटलांच्या मुलाच्या नेतृत्त्वात ट्रॅक्टर मोर्चा; प्रतिक पाटलांचे राजकीय प्रवेशाचे संकेत
राजकारण

जयंत पाटलांच्या मुलाच्या नेतृत्त्वात ट्रॅक्टर मोर्चा; प्रतिक पाटलांचे राजकीय प्रवेशाचे संकेत

सांगली : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी जयंत युवा किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांच्या नेतृत्त्वात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. आष्ठा ते इस्लामपूर या मार्गावरुन हा मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रतीक जयंत पाटील स्वतः ट्रॅक्टर चालवत मोर्चात सहभागी झाले. यावेळी बोलताना प्रतिक पाटील यांनी शेतकऱ्या आंदोलनावर आपले मत व्यक्त केले, ”नवीन आलेल्या कृषी कायद्याला राष्ट्रवादीचा विरोध आहे. शेतकऱ्यांची बाजू ऐकणं केंद्र सरकारने टाळलं आहे. शेतकरी आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. अनेक राज्यातील शेतकरी हे स्वतःची शेती सोडून दिल्लीत पोहोचले आहेत, याकडे प्रतीक पाटलांनी लक्ष वेधलं.

यावेळी बोलताना प्रतिक पाटील म्हणाले की, ”कोणतीही कंपनी काँट्रॅक्ट फार्मिंग करु शकते. करारामध्ये नियम टाकतील, कॉट्रॅक्ट फार्मिंग करताना फॉर्म सही करताना अनेक शेतकऱ्यांना वाचता येत नाही. त्यामुळे कंपन्या शेतकऱ्यांना अडचणीत आणतील. कायदा लागू करताना कायद्याची अंमलबजावणी करत असताना, अभ्यास करावा, शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घ्याव्यात, मग कायदा लागू करावा, असं वक्तव्य प्रतीक जयंत पाटील यांनी केलं.

”शेतकऱ्यांची हीच विनंती आहे की केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मनातील अडचणी ऐकून घ्याव्यात. पण केंद्र सरकार बरोबर संवाद साधायला दिल्लीत पोहोचला आहे, मात्र केंद्र सरकारने जमिनीत खिळे ठोकले, बॅरिकेट लावले, तारा बांधल्या आहेत. हे शेतकरी आपल्या भारतातील आहेत. शेतकरी आपलं म्हणणं मांडण्यासाठी सरकारच्या दारात गेले आहेत. केंद्र सरकारने अडचणी जाणून घ्याव्यात,” असं प्रतीक पाटील म्हणाले.