औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच; अशोक चव्हाणांनी विरोधकांना ठणकावले
राजकारण

औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच; अशोक चव्हाणांनी विरोधकांना ठणकावले

जालना : ”औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे. आमची नुरा कुस्ती सुरु नाही तर आम्ही या मुद्द्यावरुन भाजप आणि एमआयएमसोबत थेट नुरा कुस्ती खेळायला तयार आहोत, असे म्हणत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ठणकावून सांगितले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराविषयी काँग्रेसची भूमिका रोखठोकपणे मांडली. ”औरंगाबादचे नामांतर हा स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याविषयी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, याकडेही अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचे नामांतरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विरोध उघड विरोध केला. यामुळे संतापलेल्या मराठा ठोक क्रांती मोर्चाकडून थोरात यांच्याविरोधात शनिवारी औरंगाबादेत आक्रमक आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमेला जोडे मारत तो फाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले.

मात्र, ”निवडणुका आल्या की लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक मुद्दे उकरून काढले जातात. ही काही मंडळींची पद्धत आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना या चालीला फसणार नाहीत, असे बाळासाहेब थोरात यांनीदेखील ठणकावून सांगितले. तसेच, नाव बदलल्याने सामान्य माणसाचं जीवन बदलत नाही. उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावं बदलून काय झालं, हे पाहिलं पाहिजे. सामान्य माणसाचे भले कसे होईल, यादृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे आपलं उद्दिष्ट काय आणि आपण कशी वाटचाल करायची याबाबत संबंधितांशी चर्चा करु, असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.