धनुष्यबाण शिवसेनेकडे राहणार की नाही? उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट
राजकारण

धनुष्यबाण शिवसेनेकडे राहणार की नाही? उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट

मुंबई: शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. शिवसैनिकांनी ती चिंता सोडावी. मी घटनातज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली आहे. त्यांच्याशी चर्चा करूनच मी इतक्या ठामपणे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे सांगत असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मातोश्रीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज सकाळपासून राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होती. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास वेगळे चिन्ह घेऊन लढायची तयारी ठेवा, असे निर्देश दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले. कायद्याच्यादृष्टीने बघायला गेल्यास शिवसेनेपासून धनुष्यबाण हे चिन्ह कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

मतदानपत्रिकेवरील चिन्हाप्रमाणे लोक माणसाची चिन्हंही बघतात. लोक इतका विचार करुन मतदान करतात. मी शिवसैनिकांशी बोलताना पक्षाच्या चिन्हाबाबत मागच्या काळात काय झालं होतं, हे सांगितलं. पण त्याचा अर्थ आपण धनुष्यबाण हे चिन्ह सोडायचे, असा होत नाही. मी घटनातज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून तुम्हाला हे सांगत आहे. धनुष्यबाण हा शिवसेनाच राहील,असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

तसेच शिवसेनेच्या भवितव्याला कोणताही धोका नाही. शिवसेनेने मोठी केलेली लोकं गेली, पण ज्या लोकांनी त्यांना मोठं केलं होतं तो सामान्य मतदार शिवसेनेसोबतच आहे. शिवसेना ही काही वस्तू नव्हे, कोणी घेतला आणि पळत सुटला. रस्त्यावरील शिवसेना पक्ष हा अद्याप आपल्यासोबतच आहे.५० किंवा १०० आमदार गेले तरी पक्ष संपू शकत नाही. पक्ष हा कायम राहतो. त्यामुळे सध्या या सगळ्यावरुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. विधिमंडळ आणि नोंदणीकृत पक्ष हे दोन्ही वेगवेगळे असतात, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे आणखी काय म्हणाले?

गेले ८-१५ दिवस अव्याहत रीघ लागली आहे, त्यांच्याशी बोलत आहे. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, त्यांना मी मागे बोलले होतो, तुम्हाला काही वाटते की नाही, माशाच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत. वाईट मलाही वाटलं, भावना मलाही आहेत. मी माझ्या सैनिकांवर दडपण वाढेल, असं बोलत राहिलो तर योग्य नाही. दडपण हलकं करणं हे माझं काम आहे. ते करताना काही वेळेला गंमत सुचते, असं ठाकरे म्हणाले.