भाजप शिंदेंना देणार मोठा धक्का? बालेकिल्ल्यात येणार टीम मोदीमधील बडा नेता, रणनीती ठरणार
राजकारण

भाजप शिंदेंना देणार मोठा धक्का? बालेकिल्ल्यात येणार टीम मोदीमधील बडा नेता, रणनीती ठरणार

कल्याण: भारतीय जनता पक्षानं पुढील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपनं केंद्रीय नेत्यांकडे जबाबदारी दिली आहे. विरोधी पक्षांचे बालेकिल्ले काबीज करण्याची रणनीती भाजपकडून आखली जात आहे. त्याचाच भाग म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आली आहे. त्या २२ सप्टेंबरपासून बारामतीचा दौरा करतील. हा दौरा ३ दिवसांचा असेल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडेही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अनुराग ठाकूर पुढील आठवड्यात कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतील. ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान ते कल्याणमध्ये असतील. भाजप कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील. समाजातील विविध घटकांशी संवाद साधतील. भाजपनं शतप्रतिशतची तयारी सुरू केल्याचं स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व श्रीकांत शिंदे करतात. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत.

राज्यात भाजपच्या पाठिंब्यानं शिंदेंचं सरकार आहे. शिंदेंसोबत असलेले आमदार, खासदार आणि पदाधिकारी हीच खरी शिवसेना असल्याचा उल्लेख भाजप नेते वारंवार करतात. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप युतीचे उमेदवार मोठ्या संख्येनं विजयी होतील असा विश्वास भाजप नेत्यांकडून व्यक्त केला जातो. एकीकडे हा विश्वास व्यक्त केला जात असताना दुसरीकडे भाजपनं कल्याणसाठी मोठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

अनुराग ठाकूर यांचा दौरा कसा असेल?
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवस कल्याण मतदारसंघाचा दौरा करतील, अशी माहिती भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिली. ११ तारखेला ठाकूर डोंबिवलीत असतील. दुसऱ्या दिवशी ते अंबरनाथला जातील. तिसऱ्या दिवशी उल्हासनगरमध्ये असतील. भाजपनं कल्याण जिंकण्याची तयारी सुरू केली आहे का, असा प्रश्न केळकर यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्षष्ट उत्तर देणं टाळलं. पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्त्व निर्णय घेत असतं. केंद्रीय आणि राज्याच्या पातळीवरील नेतृत्त्व यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेईल, असं केळकर म्हणाले.