उत्तरप्रदेशात भाजपला मोठा दणका; मोदींच्या वाराणसी मतदारसंघात भाजप तिसऱ्या स्थानावर
राजकारण

उत्तरप्रदेशात भाजपला मोठा दणका; मोदींच्या वाराणसी मतदारसंघात भाजप तिसऱ्या स्थानावर

वाराणसी : उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाला जोरदार दणका बसला असून मोदींच्या वाराणसी विधानसभा मतदारसंघात भाजप तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेशमधील विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागले असून वाराणसी शिक्षक मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वाराणसी विधानपरिषदेच्या जागेवर समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. समाजवादी पक्षाचे लाल बिहारी यादव यांनी अपक्ष उमेदवार प्रमोद मिश्रा यांना 936 मतांनी पराभूत केले आहे. लाल बिहारींना एकूण 7766 मते मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार प्रमोद कुमार यांना 6830 मते मिळाली. त्याचवेळी भाजपचे उमेदवार के चेतनारायण सिंह यांना 4858 मते मिळाली होती. यावेळी ते तिसऱ्या स्थानावर राहिले.

उत्तरप्रदेशात विधानपरिषदेसाठी ११ जागांवर निवडणूक झाली असून त्यामध्ये ६ शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत होती. त्यामध्ये ६ पैकी भाजप ३ अपक्ष २ आणि सपचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे. लखनौ, मेरठ-सहारनपुर, बरेली-मुरादाबाद शिक्षक मतदारसंघात भाजप उमेदवाराचा विजय झाला आहे. तर वाराणसी मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने विजय मिळवला असून आगरा आणि गोरखपुर-फैजाबाद शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे.

ही निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्वाची होती. १०० सदस्य असलेल्या यूपी विधान परिषदेत भाजपचे आता फक्त 19 आमदार असून समाजवादी पक्षाजवळ 52 आमदार आहेत. समाजवादी पक्ष हा उत्तरप्रदेश विधानपरिषदेत सर्वात मोठा पक्ष आहे.