मोठा गौप्यस्फोट! सरकार पाडण्यासाठी पैशांची ऑफर दिल्याची भाजप आमदाराची कबुली
राजकारण

मोठा गौप्यस्फोट! सरकार पाडण्यासाठी पैशांची ऑफर दिल्याची भाजप आमदाराची कबुली

नवी दिल्ली : कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी केला आहे. पाटील पुढे म्हणाले, मी भाजपची पैशांची ऑफर न घेता भाजपमध्ये प्रवेश केला. मला पैसे नकोय, तर मला केवळ मंत्रीपद पाहिजे होतं. मात्र, मागणी करूनही मला मंत्रीपद देण्यात आलं नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मी मला दिलेली पैशांची ऑफर न घेता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मला प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले गेले होते. त्यावेळी मला पाहिजे तेवढे पैसे मागता आले असते. मात्र, मी पैशांची मागणी केली नाही. मी लोकांची सेवा करण्यासाठी मंत्रीपदाची मागणी केली होती, असंही पाटील यांनी म्हटलं आहे. मला माहित नाही की मला सध्याच्या सरकारमध्ये मंत्रीपद का दिले गेले नाही. पण पुढील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद देण्यात येईल, असं आश्वासन मला देण्यात आलं आहे. यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, असंही पाटील यांनी सांगितलं.

श्रीमंत पाटील हे कर्नाटकातील कागवाड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते काँग्रेस आणि जनता दल-सेक्युलर (जेडीएस) मधून भाजपमध्ये सामील झालेल्या १६ आमदारांपैकी एक होते. या आमदारांनी पाठिंबा काढून घेत भाजपात प्रवेश केल्याने तत्कालीन मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळले होते.