विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्रात खेळण्यात आलं; शिवसेनेच्या संपादकीयवर भाजपा नेत्याचा घणाघात
राजकारण

विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्रात खेळण्यात आलं; शिवसेनेच्या संपादकीयवर भाजपा नेत्याचा घणाघात

मुंबई : ”ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात खेळलं गेलं ते खूप वाईट होतं. विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्रात खेळण्यात आलं. भाजपासोबत युती करून आमच्या मदतीने शिवसेना निवडून आली. असा घणाघात भाजपा नेते केशव उपाध्ये यांनी केला आहे. तसेच, पश्चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्याने भाषण करण्यास नकार दिला. यावरून शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून भाजपावर निशाणा साधला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बंगालमध्ये सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेतेमंडळींना फोडून भाजपा निवडणूक लढताना दिसत आहे, अशी टीका करण्यात आली. तसेच टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान मोदी असाही उल्लेख करण्यात आला. या मुद्द्यावरून भाजपाचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.

“ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात खेळलं गेलं ते खूप वाईट होतं. विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्रात खेळण्यात आलं. भाजपासोबत युती करून आमच्या मदतीने शिवसेना निवडून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर लावून राज्यात शिवसेनेला मतं मिळाली. पण निकालानंतर ज्या पक्षांविरूद्ध शिवसेना लढली होती, त्याच पक्षांसोबत केवळ सत्तेसाठी एकत्र येऊन त्यांनी विश्वासघात केला. आणि आता याच पक्षाने अशाप्रकारची टीका करून दुसऱ्यावर बोटं दाखवणं हे हास्यास्पद आहे”, असं सडेतोड प्रत्युत्तर केशव उपाध्ये यांनी दिलं.

काय लिहिले आहे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात?
स्वातंत्र्यलढय़ात प. बंगाल, पंजाब व महाराष्ट्राचे नेतृत्व पुढे होते. आजही तीनही राज्ये स्वाभिमानासाठी लढत आहेत व केंद्र सरकार या तीनही राज्यांच्या विरोधात उभे ठाकले आहे. पश्चिम बंगालातील राजकारण दिवसेंदिवस रोचक आणि रोमांचक होताना दिसत आहे, पण रोमांचक वाटणारे बंगालचे राजकारण शेवटी रक्तरंजित वळणावर पोहोचते हा आतापर्यंतचा इतिहास आहे. हिंदुत्वाच्या मुद्दय़ांवर ठरवून ठिणगी टाकायची, हे भाजपने ठरवलेले आहे. तसे नसते तर कोलकात्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती कार्यक्रमात वादार्चीं ठिणगी पडली नसती. शासकीय कार्यक्रमात पंतप्रधान व्यासपीठावर असताना मुख्यमंत्री ममता बोलायला उभ्या राहिल्या, तेव्हा ‘जय श्रीराम’चे नारे गर्दीने दिले. ममता बॅनर्जी यावर चिडल्या व हा आपला अपमान असल्याचे त्यांनी माईकवरूनच सांगितले. ममता बॅनर्जी यांचा ‘वीक पॉइंट’ बंगाल भाजपने ओळखला आहे व निवडणुका होईपर्यंत ते अशा नाजूक विषयांवर मर्मभेद करीत राहतील. ‘जय श्रीराम’च्या नाऱयांवर ममता चिडू नयेत, या मताचे आम्ही आहोत. उलट त्यांच्या सुरात सूर मिसळला असता तर डाव समोरच्यांवरच उलटला असता, पण प्रत्येक जण आपल्या व्होट बँकेचीच पखाली वाहत असतो. प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव करायचाच, प. बंगालवर भाजपचा विजयध्वज फडकवायचाच या जिद्दीने भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व बंगालच्या मैदानात उतरले आहे. स्वतः गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा व इतर अनेक नेत्यांचा बंगालातील राबता वाढला आहे. टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान मोदीही काल कोलकात्यात येऊन गेले. निवडणुकांत कोणीतरी जिंकेल व कोणीतरी हरणारच आहे. हिंदुस्थानी लोकशाही ‘ट्रम्प छाप’ नाही. काैल हा स्वीकारावाच लागतो. पण काैल आपल्या बाजूने वळावा, यासाठी जे अघोरी प्रयोग आपल्या लोकशाहीत केले जातात ते असह्य ठरतात. उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणेच प. बंगालात भाजपने धार्मिक फाळणी सुरू केली आहे. त्यास काही प्रमाणात ममता बॅनर्जी जबाबदार आहेत. कमालीचा सेक्युलरवाद व टोकाचे मुस्लिम लांगूलचालन याचा वीट बहुसंख्य हिंदूंना येतच असतो. प. बंगालात लोकसभा निवडणुकीआधी दुर्गापूजा व विसर्जनावरून भाजपने तद्दन खोटा प्रचार केला व ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री असूनही त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचत नव्हता.