तालिबानला ऑस्ट्रेलिया क्रिकेटचं जोरदार उत्तर; महिला नाही तर…!
क्रीडा

तालिबानला ऑस्ट्रेलिया क्रिकेटचं जोरदार उत्तर; महिला नाही तर…!

काबूल : अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यानंतर तालिबानने महिला खेळाडूंवर बंदी घालण्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या निर्णयाचा विरोध केला असून अफगाणिस्तानात महिला क्रिकेटला समर्थन दिलं नाही तर पुरुष क्रिकेट संघासोबत होणारा प्रस्तावित सामना खेळणार नाही असा इशारा दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे उपप्रमुख अहमदुल्लाह वासिक यांनी अफगाणिस्तानमधील महिलांना क्रिकेट सहित अन्य खेळांमध्ये भाग घेता येणार नाही असं जाहीर केलं आहे. अहमदुल्लाह वासिक यांनी स्थानिक माध्यामांशी संवाद साधतांना ही माहिती दिली आहे.

तालिबानने पुरुष क्रिकेट संघाच्या दौऱ्यात कोणताही अडथळा येणार नाही असं जाहीर केलं होतं. तसंच क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही २७ नोव्हेंबरला होणारा प्रस्तावित सामना पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र गुरुवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महिला क्रिकेटची प्रगती होणं जागतिक स्तरावर महत्वाचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. क्रिकेटसाठी हा सर्वांसाठी खेळ आहे हेच आमचं व्हिजन असून आणि आम्ही प्रत्येक स्तरावर महिलांसाठी या खेळाचे निर्विवाद समर्थन करतो, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटलं आहे.

जर मीडियामध्ये आलेल्या वृत्तांनुसार, अफगाणिस्तानात महिला क्रिकेटला समर्थन देण्यात येणार नसल्याचं वृत्त खरं असलं तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे पुरुष संघासोबतचा प्रस्तावित सामना रद्द करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नसेल, असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे.