भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा; इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत
क्रीडा

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा; इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत

चेन्नई : भारतीय संघानं पहिल्या डावांत उभारलेल्या ३२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात अडखळत झाली आहे. उपहारापर्यंत इंग्लंड संघानं १८ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात ३९ धावा केल्या होत्या. उपहारानंतर इंग्लंडच्या संघाला आणखी एक धक्का बसला असून पाहुण्या इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. फिरकीपटू आर. अश्विननं महत्वाचे तीन बळी घेत इंग्लंडला अडचणीत टाकलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ८ गडी बाद झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाचे चार आणि इंग्लंड संघाचे चार फलंदाजांचा समावेश आहे. भारतीय संघानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांपुढे नांगी टाकली आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्मानं रॉरी बर्न्स याला बाद करत इशांत शर्मानं भारताला पहिलं यश मिळवून दिलं. तर आर. अश्विन यानं सिब्ली आणि लॉरेन्स यांना बाद करत इंग्लंडला अडचणीत टाकलं. पदार्पणवीर अक्षर पटेल यानं जो रुट याला बाद करत इंग्लंडचं कंबरडं मोडलं आहे.

उपहारानंतही इंग्लंडची सुरुवात खराब झाली असून भरवशाच्या बेन स्टोक्सला त्रिफळाचित केले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडची ५ बाद ६२ अशी धावसंख्या झाली होती.