WTC : भारत पुन्हा पहिल्या स्थानावर; इंग्लंड स्पर्धेबाहेर
क्रीडा

WTC : भारत पुन्हा पहिल्या स्थानावर; इंग्लंड स्पर्धेबाहेर

अहमदाहाद : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं अहमदाबाद येथील कसोटी सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाचा दहा गड्यांनी पराभव केला. या विजयासाह भारतीय संघानं आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. तर या स्पर्धेतून इंग्लंडचा संघ बाहेर झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ चौथ्या स्थानावर घसरला होता. पण, त्यानंतर लागोपाठ दोन सामन्यात विजय मिळवत आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. लागोपाठ दोन सामन्यात पराभव स्विकारणाऱ्या इंग्लंड संघाचं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार भारतीय संघ प्रथम स्थानावर आहे.

भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी ७१ इतकी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलड संघाच्या विजयाची टक्केवारी ७० इतकी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ६९.२ आहे. आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतलं अव्वल दोन संघामध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर अंतिम सामना होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा स्थगित करण्यात आला. त्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष फायदा WTC गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडला झाला आणि त्यांना थेट फायनलचं तिकीट मिळालं. पण, न्यूझीलंडविरूद्ध अंतिम सामन्यात कोणता संघ खेळणार याबाबतचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या स्थानासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांना संधी आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचण्यासाठी भारतीय संघाला उर्वरीत सामना जिंकणं किंवा अनिर्णीत राखणं गरजेचं आहे. अखेरच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत धडक मारेल.