भारताची पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर भरभक्कम १३१ धावांची आघाडी
क्रीडा

भारताची पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर भरभक्कम १३१ धावांची आघाडी

मेलबर्न : मेलबर्न कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारतीय संघाने ३२६ धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियावर १३१ धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९५ धावांवर गारद केल्यानंतर भारताने कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि मधल्या फळीत रविंद्र जाडेजाने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर त्रिशतकी मजल मारली आघाडी घेतली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ५ बाद २७७ पर्यंत मजल मारलेल्या भारताने तिसऱ्या दिवशी सावध सुरुवात केली. रविंद्र जाडेजाने आपलं अर्धशतक पूर्ण करण्याच्या नादात एकेरी धाव घेताना संभ्रम निर्माण करत शतकवीर अजिंक्य रहाणेला धावबाद केलं. २२३ चेंडूत १२ चौकारांसह ११२ धावा करुन रहाणे बाद झाला. यानंतर आश्विनच्या सहाय्याने जाडेजाने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

भारताचे अखेरच्या फळीतले फलंदाज थोडीफार झुंज देतील अशी अपेक्षा होती. परंतू स्टार्कने जाडेजाला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या दिवशी आणखी एक महत्वाचा बळी मिळवून दिला. यानंतर इतर फलंदाजांनी मैदानावर हजेरी लावून परतणं पसंत केलं. अखेरीस ३२६ धावांवर भारताचा पहिला डाव संपवण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं. कांगारुंकडून मिचेल स्टार्क आणि नॅथल लियॉनने ३-३, पॅट कमिन्सने २ तर जोश हेजलवूडने १ बळी घेतला.