भर पावसात स्वत: गाडी चालवत मुख्यमंत्री निघाले पंढरपूरला
बातमी महाराष्ट्र

भर पावसात स्वत: गाडी चालवत मुख्यमंत्री निघाले पंढरपूरला

मुंबई : मंगळवारी (ता. २०) आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्निक रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा ताफा आज दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरच्या दिशेने रावाना झाला. मुंबईमध्ये सतत कोसळणारा पाऊस आणि खराब हवामानामुळे त्यांना विमानाने पंढरपूरला जाता येणं शक्य नसल्याने ते रस्ते मार्गानेच पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला चालले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून या महापुजेला उपस्थित राहण्याचं हे दुसरं वर्ष ठरणार आहे. मुख्यमंत्री आज मध्यरात्री पंढरपूरच्या मंदिरामध्ये आषाढीच्या पुजेआधी होणाऱ्या पुजेसाठीही उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पहाटे दोनच्या सुमारास शासकीय विश्रामगृहामधून रुक्मिणी मंदिरात जाणार आहेत. त्यानंतर ते २ वाजून १० मिनिटांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल होती. रात्री २.२० मिनिटांनी होणाऱ्या शासकीय महापुजेस ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते सकाळी ११ वाजता पुन्हा मुंबईच्या दिशेने रावाना होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या ताफ्यासोबत पोलिसांच्या बऱ्याच गाड्याही आहेत. मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली असून त्यांच्या ताफ्यासोबत असणाऱ्या वाहनांची माहितीही सोलापूर जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.