चार तासांत लागला अ‍ॅडलेड कसोटीचा निकाल, भारताचा दारुण पराभव
क्रीडा

चार तासांत लागला अ‍ॅडलेड कसोटीचा निकाल, भारताचा दारुण पराभव

अॅडलेड : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीचा निकाल खेळाच्या तिसऱ्या दिवशी अवघ्या ४ तासात लागला आहे. भारतीय संघाचा या कसोटीत दारुण पराभव झाला आहे. दुसऱ्या दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडलेड कसोटी सामन्यावर वर्चस्व निर्माण करणाऱ्या भारतीय संघाचं आव्हान तिसऱ्या दिवशी अवघ्या काही तासांत नाट्यमयरित्या संपुष्टात आलं आहे. ८ गडी राखून भारतावर मात करत ऑस्ट्रेलियाने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक माऱ्यापुढे भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने आपली निच्चांकी धावसंख्याही यादरम्यान नोंदवली. विजयासाठी मिळालेलं ९० धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केलं. मॅथ्यू वेड आणि बर्न्स यांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. जो बर्न्सने नाबाद ५१ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघाने १ बाद ९ अशी मजल मारली. दिवसाअखेरीस ६२ धावांची आघाडी मिळवलेल्या भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. नाईट वॉचमन जसप्रीत बुमराहला कमिन्सने झटपट माघारी धाडलं. यानंतर भारतीय संघाला लागलेली गळती थांबलीच नाही. यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ९० धावांचं सोपं आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण करत कांगारुंनी संघाच्या ८ गडी राखून विजयावर शिक्कामोर्तब केलं.