तिसऱ्या दिवशी भारताला धक्के; सामन्यावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
क्रीडा

तिसऱ्या दिवशी भारताला धक्के; सामन्यावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

सिडनी : तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताला मोठे धक्के बसले त्यामुळे तिसऱ्या दिवशी सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारत वर्चस्व राखले आहे. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने २ बाद १०३ अशी मजल मारली असून त्यांच्याकडे एकूण १९७ धावांची आघाडी आहे. आज भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताला अजिंक्य रहाणेकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या, पण अजिंक्यला या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. भारतीय संघाच्या २० धावा पूर्ण व्हायच्या आतमध्येच अजिंक्य बाद झाला, त्याला २२ धावांवर समाधान मानावे लागले. अजिंक्य बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या हनुमा विहारीला फक्त चारच धावा करता आला आणि तो पुन्हा एकदा अपयशी ठरला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारताला दोन धक्के लवकर बसले होते. पण यामधून संघाला बाहेर काढले ते चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांनी. यावेळी पुजाराने अर्धशतकी खेळी साकारत संघाचा डाव सावरला. त्याचबरोबर पंतने मोठी खेळी साकारली नसली तरी त्याने पुजारा चांगली साथ दिली. त्यामुळेच भारतीय संघाला दोनशे धावांपर्यंत पोहोचता आले. पण फक्त चार चेंडूंच्या फरकाने पंत आणि पुजारा बाद झाले. या गोष्टीचा मोठा फटका भारतीय संघाला बसला. पुजाराने यावेळी पाच चौकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली, तर पंतने चार चौकारांच्या जोरावर ३६ धावा केल्या.

पहिल्या डावात आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात यावेळी चांगली झाली नाही. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने यावेळी विल पुकोव्हस्कीला बाद करत ऑस्ट्रेलियाला झटपट पहिला धक्का दिला. त्यानंतर सलामीवीर वॉर्नर हा फटकेबाजी करत होता. पण आर. अश्विनने यावेळी वॉर्नरचा काटा काढत संघाला मोठे यश मिळवून दिले. पण त्यानंतर मात्र मार्नस लाबुशेन आणि स्टीव्हन स्मिथ या जोडीने भारतीय गोलंदाजांचा सामना करत दुसरा दिवस खेळून काढला.