भारतीय संघाला दोन मोठे धक्के; दोन महत्त्वाचे खेळाडू झाले जायबंदी
क्रीडा

भारतीय संघाला दोन मोठे धक्के; दोन महत्त्वाचे खेळाडू झाले जायबंदी

पुणे : इंग्लंडविरुद्ध चालू असलेल्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताला दोन मोठे धक्के बसले आहेत. पुण्यामध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने पाहुण्या संघाचा ६६ धावांनी धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण, या सामन्यादरम्यान भारतीय संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू जायबंदी झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर हे दोघं पहिल्या एकदिवसीय सामन्यात जायबंदी झाले आहेत. बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली, त्यामुळे श्रेयसला मैदानातून बाहेर जावं लागलं. त्याच्याजागी शुबमन गिल क्षेत्ररक्षणासाठी आला. इंग्लंड फलंदाजी करत असताना आठव्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोने मारलेला शॉट अडवताना श्रेयस अय्यर जखमी झाला. तर, भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा फलंदाजी करताना जखमी झाला. डावाच्या पाचव्या षटकात उजव्या हाताच्या कोपरावर मार्क वूडचा चेंडू लागल्याने तो जखमी झाला.

रोहितच्या जागी सूर्यकुमार यादव क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला होता. आता उर्वरित 2 सामन्यांपर्यंत जर दोन्ही खेळाडूंची प्रकृती सुधारली नाही तर दोघंही एकदिवसीय मालिकेतून बाहेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असं झाल्यास हा भारतीय संघासाठी मोठा धक्का ठरू शकतो.