चेन्नईच्या स्टार खेळाडूचा निवृत्ती घेण्याचा निर्णय
क्रीडा

चेन्नईच्या स्टार खेळाडूचा निवृत्ती घेण्याचा निर्णय

चेन्नई : आयपीएल २०२१च्या दुसऱ्या पर्वामध्ये चेन्नईचा संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी असतानाच चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो आता इंग्लंडकडून रेड बॉल क्रिकेट म्हणजेच कसोटी सामने खेळणार नाही. लवकरच तो यासंदर्भातील अधिकृत घोषणा करणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मोईनने आपल्या या निर्णयाबद्दल इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट, प्रशिक्षक क्रिस सिल्वरवूड आणि निवड समितीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मोईनने हा निर्णय घेतला आहे. ३४ वर्षीय मोईनने इंग्लंडसाठी ६४ कसोटी सामने खेळले आहेत.

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार मोईन हा पुढील महिन्यात होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धा आणि अ‍ॅशेस मालिकेमध्ये खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघामधील संभावित सदस्यांमध्ये आहे. या दोन्ही मालिकांमध्ये खेळण्यासाठी मोईनला घरापासून फार काळ दूर रहावं लागलं असतं. मात्र यासंदर्भात मोईन हा संदिग्धावस्थेत होता. म्हणूनच त्याने कसोटीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता अ‍ॅशेससाठी त्याचा विचार केला जाणार नाही. अर्थात मोईन मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करण्यास इच्छूक आहे. तसेच तो काउंटी आणि इतर फ्रेंचायझींसाठी क्रिकेट खेळत राहणार आहे. तो प्रथम श्रेणीमधील क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे की नाही याबद्दल त्याने अद्याप आपला निर्णय जाहीर केलेला नाही.