ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन; उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
क्रीडा

ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन; उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

पुणे : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर (वय 88) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. औंध येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदू नाटेकर यांच्या निधनाबद्दल ट्विटरद्वारे तीव्र शोक व्यक्त केला. तसेच देशातील अनेक क्रीडा संघटना व खेळाडूंसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतीय खेळाडू आज आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवित असलेले यश नंदू नाटेकर यांनी त्याकाळात रचलेल्या भक्कम पायावर उभे आहे. नंदू नाटेकर यांचे निधन ही बॅडमिंटन क्षेत्राची, राज्याच्या क्रीडाविश्वाची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचे स्मरण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, जागतिक बॅडमिंटन नकाशावर नंदू नाटेकर यांच्या अलौकिक खेळामुळे भारताचे नाव चमकत राहिले. 1954 मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत त्यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. 1956 मध्ये मलेशियातील सेलंगर स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय ठरण्याचा मान नाटेकर यांना मिळाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेतेपद पटकाविणारे ते पहिले भारतीय ठरले. 1961 मध्ये अमृतसर येथील राष्ट्रीय स्पर्धेत ते ट्रिपल क्राऊन विजेते ठरले. ते सहा वेळा राष्ट्रीय पुरुष एकेरी विजेतेपदाचे मानकरीही ठरले होते. पुरुषांच्या थॉमस कप स्पर्धेत 16 पैकी 12 एकेरी सामनेही त्यांनी जिंकले होते.

थायलंड येथील खुल्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेतही त्यांनी विजय संपादन केला. 1950-60 च्या दशकात भारतात सर्वदूर बॅडमिंटन हा खेळ घरोघरी त्यांच्या खेळाच्या शैलीने पोचवला. हे त्यांचे सर्वांत मोठे श्रेय आहे. त्यांच्या खेळातील प्रावीण्यामुळे त्या काळात संपूर्ण देशात जणू क्रीडा संस्कृती रुजण्यास सुरुवात झाली व बॅडमिंटन बरोबरच अन्य खेळांचेही आकर्षण वाढून राष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडू घडले. त्यांच्या निधनाने भारतीय बॅडमिंटन क्षेत्रातील एक पर्व संपले.