Tokyo Paralympics : प्रवीण कुमारची रौप्यपदकाला गवसणी; भारताला ११वं पदक
क्रीडा

Tokyo Paralympics : प्रवीण कुमारची रौप्यपदकाला गवसणी; भारताला ११वं पदक

टोक्यो : पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताने ११व्या पदकाची कमाई केली आहे. उंच उडी प्रकारामध्ये प्रवीण कुमारने रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. पुरुष उंच उडी टी ६४ प्रकारामध्ये प्रवीणने ही कामगिरी केली आहे. या स्पर्धेमधील भारताचं हे ११ वं पदक ठरलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ग्रेट ब्रिटनच्या जॉनथन ब्रूम एडवर्ड्स आणि प्रवीणमध्ये सुवर्णपदकासाठी अगदी अटीतटीची लढत पहायला मिळाली. पहिल्या प्रयत्नात प्रवीणने १.८८ मीटरची उडी मारत पहिलं स्थान पटकावलं. नंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने १.९३ मीटरची उडी मारली. इथून एडवर्ड्स आणि प्रवीणमध्ये अटीतटीचा सामना सुरु झाला. तिसऱ्या प्रयत्नात प्रवीणने १.९७ मीटरची उडी मारली. त्याला ब्रिटनच्या एडवर्ड्सने आणि पोलंडच्या मिसीज लिपिएटोने कडवी झुंज दिली. पुढील प्रयत्नात प्रवीण आणि लिपिएटो दोघांनी २.०४ मीटर उडी मारली. त्यापाठोपाठ एडवर्ड्सनेही ही कामगिरी करत पदकासाठीची चुरस आणखीन वाढवली. पुढील प्रयत्नात प्रवीणने २.०७ मीटरची उडी मारत आशियाई विक्रम स्वत:च्या नावे केला. अंतिम पदकासाठी एडवर्ड्स आणि प्रवीण यांच्यामध्ये चुरस रंगली. मात्र येथे एडवर्ड्सने २.१० मीटर उडी मारत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

भारताची ११ पदकं…
या विजयासहीत भारताच्या खात्यामध्ये सहाव्या रौप्यपदकाची नोंद झाली आहे. भारताने आतापर्यंत टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये एकूण दोन सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकली आहेत.