महाराष्ट्र केसरी स्पर्धेला राज्यसरकारची परवानगी; मात्र कोरोनाविषयक नियमांचे पालन अनिवार्य
क्रीडा

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला राज्यसरकारची परवानगी; मात्र कोरोनाविषयक नियमांचे पालन अनिवार्य

मुंबई : राज्यसरकारने महाराष्ट्र केसरी किताब लढत आणि ६४व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला परावागगी दिली आहे. मात्र त्यांना कोरोनाविषयक सर्व शिष्टाचारांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पाठपुरावा केला होता. आता कुस्ती स्पर्धेला परवानगी दिल्यामुळे राज्य कुस्तिगीर परिषदेनंही सरकारचे जाहीर आभार मानले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘‘शासनाने दिलेल्या अटी-शर्तीनुसार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी परवानगी मिळाली आहे. आता कार्यकारिणी समितीच्या बैठकीत आम्ही आयोजनाचे धोरण ठरवू,’’ अशी माहिती राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली. तसेच, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन केले जाण्याची दाट शक्यता आहे. ही स्पर्धा फेब्रुवारीच्या उत्तरार्धात किंवा मार्चच्या पहिल्या आठवडय़ात आयोजित केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याआधी वैयक्तिक कौशल्य आणि तंदुरुस्तीपुरती खेळाडू आणि प्रशिक्षकांना प्रमाणित कार्यपद्धतीनुसार परवानगी होती. मात्र, कोविड 19 संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, नियम आणि अटींचे पालन करावे लागणार आहे. सुरक्षित अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, थर्मन स्कॅनिंग, इत्यादी कोविड-१९ करिता घालून दिलेल्या सर्व निकषांचे पालन करण्याच्या अटीवर स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देण्यात आली असल्याचे शासनाने पत्रकात म्हटले. त्याचबरोबर, महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी राज्याच्या अनेक भागांतून कुस्तीशौकिन गर्दी करतात. मात्र यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर  प्रेक्षकांच्या संख्येवर मर्यादा येऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.