अखेर फ्लिपकार्टवर मराठी भाषेचा समावेश झालाच; राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला
बातमी महाराष्ट्र

अखेर फ्लिपकार्टवर मराठी भाषेचा समावेश झालाच; राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला

मुंबई : ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्टच्या अॅपवर मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावरुन अ‍ॅमेझॉन आणि मनसेमध्ये झालेला संघर्ष ताजा असताना फ्लिपकार्टने त्यांच्या अॅपवर मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, मनसेने फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनला मराठीत अ‍ॅप आणलं नाही तर त्यांची दिवाळी मनसे स्टाइल साजरी होईल असा इशारा दिला होता. त्यानंतर अ‍ॅमेझॉनने मनसे विरोधात कोर्टात धाव घेतली. त्यामुळे संतापलेल्या मनसेने अ‍ॅमेझॉनचे मुंबईतील कार्यालय फोडले. यावेळी अ‍ॅमेझॉन आणि मनसेत बराच मोठा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र फ्लिपकार्टने दिलेलं आश्वासन पाळलं. सध्या उपलब्ध असलेल्या भाषांव्यतिरिक्त अन्य अनेक भाषांचाही फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर समावेश असेल, असे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार फ्लिपकार्टने आता ग्राहकांना मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला आहे.

याबाबत फ्लिपकार्टचे चीफ प्रोडक्ट अॅण्ड टेक्नॉलॉजी ऑफिसर जयेंद्रन वेणुगोपाल म्हणाले की, “आमच्या व्यासपीठावरील सहा प्रादेशिक भाषांमध्ये मराठी/चा समावेश करणे म्हणजे ई-कामॅर्स अधिक सर्वसमावेशक करण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे आणि भाषेचे अडसर दूर करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असेल. या सर्व घडामोडी म्हणजे फ्लिपकार्टवर प्रादेशिक सेवांचा विस्तार करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग असून त्यामुळे देशभरातील लाखो ग्राहकांसाठी ई-कामॅर्स अधिक सहज उपलब्ध आणि सोयीस्कर होऊन भारतात ई-कामॅर्सचे लोकशाहीकरण करण्यात कळीची भूमिका बजावेल.”

मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांची बोली भाषा आहे. फ्लिपकार्ट अॅप आता इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ आणि तेलुगु अशा सहा महत्त्वाच्या भाषा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट या भारतातील एतद्देशीय बाजारपेठेने मराठी भाषा सादर करून आपल्या प्रादेशिक भाषेच्या सेवेला अधिक बळकटी दिली आहे. प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या लाखो ग्राहकांसमोरील मुख्य अडथळा यामुळे दूर होणार आहे. यामुळे भारतीय ग्राहकांसाठी ई कॉमर्स अधिक सर्वसमावेशक सहज उपलब्ध करून देण्याची आपली बांधिलकी फ्लिपकार्टने अधिक बळकट केली आहे.

ई-कॉमर्सकडे वळणाऱ्या भारतीय ग्राहकांसमोरील समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण पर्याय देण्याच्या फ्लिपकार्टच्या प्रयत्नांचा भाग म्हणून या व्यासपीठावर प्रादेशिक क्षमतांचा विकास करण्यात येत आहे. त्याचबरोबर, २०११ च्या जनगणनेनुसार मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. लाखो फ्लिपकार्ट वापरकर्त्यांना वैयक्तिक आणि बोलीभाषेतील अनुभव देण्यासाठी ५.४ दशलक्षांहून अधिक शब्दांचे भाषांतर आणि लिपित लेखन (ट्रान्सलिटरेशन) करण्यात आले आहे. फ्लिपकार्टच्या ‘लोकलायझेशन अॅण्ड ट्रान्सलेशन प्लॅटफॉर्म’वर उपलब्ध ही सोय ग्राहकांना ईकॉमर्सचा अथपासून इतिपर्यंत सहजसुंदर अनुभव देणार आहे.