शार्दुल-सुंदरची धडाकेबाज खेळी; पहिल्या डावात भारताची ३३६ धावांपर्यंत मजल
क्रीडा

शार्दुल-सुंदरची धडाकेबाज खेळी; पहिल्या डावात भारताची ३३६ धावांपर्यंत मजल

ब्रिस्बेन : शार्दुल ठाकूर आणि वॉशिंगटन सुंदर यांनी सातव्या गड्यासाठी केलेल्या १२३ धावांच्या भागिदारीच्या बळावर भारतीय संघानं पहिल्या डावात ३३६ धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावांत किरकोळ ३३ धावांची आघाडी मिळाली आहे. १८६ धावांवर आघाडीचे सहा फलंदाज तंबूर परतल्यानंतर भारतीय संघ २०० धावांपर्यंत मजल मारेल का? अशी शंका असताना सुंदर आणि शार्दुल ठाकूरनं जबाबदारीनं फलंदाजी करत भारतीय संघाची धावसंख्या तीनशेपार पोहचवली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शार्दुल ठाकूरनं ११५ चेंडूचा सामना करताना ९ चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीनं ६७ धावांची खेळी केली. तर सुंदरनं १४४ चेंडूचा सामना करताना सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं ६२ धावांची खेळी केली. सुंदर-शार्दुल या जोडीनं ब्रिस्बेनमध्ये सातव्या क्रमांकावरील सर्वात मोठी भागिदारी केली आहे.

तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे झटपट बाद झाले. त्यानंतर आलेल्या पंत आणि मयांक अगरवाल यांनी दुसऱ्या सत्रात धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंत आणि मयांकला चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. कर्णधार अजिंक्य रहाणे (३७), रोहित शर्मा (४४) ऋषभ पंत (२३), मयांक अगरवाल (३८), शुबमन गिल (३) आणि चेतेश्वर पुजारा (२५) यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडनं सर्वात प्रभावी मारा केला. हेलवूडनं पाच बळी घेतले. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कला प्रत्येकी दोन बळी मिळाले. तर १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लायनला एक विकेट मिळाली.

त्यानंतर फलंदाजीस आलेल्या ऑस्ट्रेलियाने बिनबाद २१ धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर नाबाद २० तर हॅरिस १ धावांवर खेळत आहेत.