कोहलीने केला वर्ल्ड रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज
क्रीडा

कोहलीने केला वर्ल्ड रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने शानदार कामगिरी करत विजय मिळवला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली याने नाबाद ७३ धावा केल्या. विराटने ४९ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकांसह ही खेळी केली. या खेळीत विराटने काही विक्रम स्वत:च्या नावावर केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंग्लंडविरुद्धच्या ७३ धावाच्या खेळीत विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १२ हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा कर्णधार आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग आणि दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ यांनी अशी कामगिरी केली आहे. दुसऱ्या टी-२० मध्ये १७ धावा करताच तो या खास यादीत गेला. कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पॉन्टिंगच्या नावावर आहे. त्याने कर्णधार म्हणून १५ हजार ४४० धावा केल्या तर ग्रॅमी स्मिथने १४ हजार ८७८ धावा केल्या आहेत.

विराट सध्या स्मिथ आणि पॉन्टिंग यांच्यापेक्षा मागे असला तरी कर्णधार म्हणून सर्वात वेगाने १२ हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर झाला आहे. त्याने फक्त २२६ डावात ही कामगिरी केली. यासाठी पॉन्टिंगला २८२ तर स्मिथला २९४ डाव खेळावे लागले होते. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये विराटने केलेला आणखी एक विक्रम म्हणजे टी-२० त्याने ३ हजार धावांचा टप्पा पार केला. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ३ हजारचा टप्पा पार करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.