अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जयंत पाटलांचे भाजपा नेत्याला प्रत्युत्तर
राजकारण

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जयंत पाटलांचे भाजपा नेत्याला प्रत्युत्तर

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवसाथानाबाहेर एका कारमध्ये स्फोटक सापडली. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक सचिन वझे यांचा सहभाग, मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर आणि एकंदरीतच गृहमंत्रालयाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं होतं. विरोधी पक्षाही विधानसभेत चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला होता. एकंदरीत या सर्व प्रकरणात खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांचाच राजीनामा घेतला जाण्याची चर्चा सुरू झाली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या प्रकरणात सचिन वझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केल्यानंतर आता या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केली. प्रसाद लाड यांनी ट्वीट करत गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ”सचिन वाझे प्रकरणातील जी मोठी नावे बाहेर येतायत किंवा येतील आणि यातून झालेली मुंबई पोलिसांची नाचक्की खेदजनक आहे. अशा लोकांना पाठीशी घालणे अत्यंत चुकीचे आहे, त्यामुळे याची नैतिक जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वीकारून राजीनामा द्यावा!” असे ट्वीट प्रसाद लाड यांनी केले आहे.

मात्र, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. “अनिल देशमुख गृहमंत्री म्हणून व्यवस्थित कारभार करत असल्याने त्यांच्या राजीनाम्याचा कोणताही विषय पक्षासमोर नाही. त्यामुळे यावरून वावड्या उठवण्याची गरज नाही. सचिन वझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखांनीही कोणतीही चूक केली नाही, सचिन वाझे प्रकरणाचा तपास NIA करत आहेत. सरकार कोणालाही पाठिशी घालत नाही, जे कोणी चुकीचे वागले असतील तर त्यांना शिक्षा होईलच, असं सांगत जयंत पाटील यांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली आहे.

मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याची कोणतीही चर्चा नाही, कोणी कितीही संकेत दिले तरी ते राष्ट्रवादी पक्षांतर्गंत मंत्रिमंडळ खातेबदलावर चर्चा नाही असं सांगत जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा फेटाळली.