२६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड जकी-उर-रहमान लखवीला अटक
इतर बातमी विदेश

२६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड जकी-उर-रहमान लखवीला अटक

इस्लामाबाद : दहशतवाद्यांना आर्थिक मदत दिल्याच्या आरोपाखाली आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या जकी-उर-रहमान लखवीला अटक करण्यात आली आहे. मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड लखवीला लाहोरमधून अटक करण्यात आली. जकी-उर-रहमान लखवीला अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाच्या प्रवक्त्यांनी दुजोरा दिला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२६ नोव्हेंबर २००८ रोजी लष्कर-ए-तोयबानं मुंबईतील अनेक ठिकाणांवर दहशतवादी हल्ले केले होते. या हल्ल्यांमागे पाकिस्तानचं लष्कर आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याचे पुरावे भारताला मिळाले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात दीडशेहून अधिक जण मृत्यूमुखी पडले. यामध्ये परदेशी नागरिकांचादेखील समावेश होता. जकी-उर-रहमान लखवी या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. त्याला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.

फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या (FATF) काळ्या यादीत समावेश होऊ नये यासाठी पाकिस्तानकडून विविध क्लृप्या वापरल्या जातात. आपण दहशतवाद्यांविरोधात कारवाया करत असल्याचा देखावा पाकिस्तानकडून उभा केला जातो. याआधी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानच्या एफआयएनं मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत मुंबईवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या ११ जणांचा समावेश केला होता. दवाखान्याच्या नावाखाली मिळणारा निधी दहशतवादी कारवायांसाठी वापरल्याचा आरोप लखवीवर आहे. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं लखवीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादी घोषित केलं.

सप्टेंबर 2019 मध्ये भारतात यूएपीए अंतर्गत लखवीला दहशतवादी घोषित करण्यात आले होते. यूएपीएमध्ये सुधारणा करण्यापूर्वी केवळ संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले जाऊ शकत होते. परंतु आता दहशतवादी कारवायांमध्ये सामील असलेल्या कोणालाही दहशतवादी घोषित केले जाऊ शकते.

तथापि, एक दशकापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तान अद्याप हा हल्ला करण्यामागील सूत्रधार, हाफिज मुहम्मद सईद आणि त्याच्या गुंडांना शिक्षा दिली नाही. भारताने अद्याप आरोपींवरील आरोप सिध्द करणारी पुरेशी कागदपत्रे दिली नसल्याने त्यांना शिक्षा दिली नसल्याचे पाकिस्तानने म्हंटले आहे. तर पाकिस्तानने भारतीय कागदपत्रे आणि पुरावे नाकारल्यामुळे हे प्रकरण अजूनही प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे.