तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय खेळाडूंचा आला कोरोना चाचणी अहवाल
क्रीडा

तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय खेळाडूंचा आला कोरोना चाचणी अहवाल

सिडनी : तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संपूर्ण भारतीय संघाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. बीसीसीआयने यासंदर्भात माहिती दिली असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी मेलबर्नमधील रेस्तराँमध्ये कोरोनासंबंधित नियमांचं उल्लंघन करताना दिसल्यानंतर वाद निर्माण झाला होता. यामुळे भारतीय संघाला कोरोना संकटाचा सामना करावा लागतो का काय? अशी शंका निर्माण झाली होती. परंतु भारतासाठी हे दिलासा देणारे वृत्त आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

३ जानेवारीला भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांची कोरोना चाचणी करण्यात आली. सर्व चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली. एकीकडे खेळाडूंनी नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ऑस्ट्रेलियामधील मीडिया लक्ष्य करत असताना भारतीय संघाने मात्र संपूर्ण लक्ष सिडनीमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याकडे केंद्रीत केलं होतं. ७ जानेवारीपासून सिडनीमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

ऑस्ट्रेलियासोबत तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज असलेल्या भारतीय संघाला ही दिलासा देणारी बातमी आहे. प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या भारतीय संघासाठी चिंतेची बाब नसून तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीमध्ये कोणतीही उणीव ठेवली जात नाही आहे. सध्या ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघ प्रत्येकी एक सामना जिंकत बरोबरीत आहेत.