बाळासाहेब थोरातांनंतर जितेंद्र आव्हाडांचा ठाकरे सरकारला टोला
राजकारण

बाळासाहेब थोरातांनंतर जितेंद्र आव्हाडांचा ठाकरे सरकारला टोला

कल्याण : ”कल्याणमधील रस्त्यांची दुर्दशा बघवत नसून काहीतरी बदल घडवून आणला पाहिजे. हा बदल घडवून आणण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा, कारण इतके वाईट रस्ते महाराष्ट्रत कुठेही नसतील,” असे म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कल्याणमधील रस्त्यांच्या दुर्देशचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना उपरोधिक टोला लगावला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कल्याणमधील रस्त्यांच्या दुर्देशचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. कल्याणमध्ये आल्यावर रस्त्यांची दुर्दशा बघवत नाही, अख्ख्या महाराष्ट्रात असे रस्ते कोठे नसतील असे वक्तव्य करत त्यांनी महाविकास आघाडीतील सेनेच्या नेत्यांना घरचा आहेर दिला. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर हे मंचावर उपस्थित होते.

एकीकडे शिवसेना तरुणांना सेनेकडे आकर्षिक करण्याचा प्रयत्न करत असताना आव्हाड यांनीही तरुणांनी विचार करावा, असा सल्ला देत तरुणांना राष्ट्रवादीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत रस्त्यांचा मुद्दाही चांगलाच गाजणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी चांगला रस्ता शोधून दाखवा अशी स्पर्धा भरविण्यास सांगत कानपिचक्या देखील दिल्या. कल्याण डोंबिवली शहरात काँक्रिट रस्त्याची कामे सुरू असली तरी अनेक रस्ते उखडले असून या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे उडणारी धूळ यामुळे नागरिक वाहनचालक बेजार झाले आहेत. तर भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही काही दिवसांपूर्वी डोंबिवली शहराचा अस्वच्छ शहर असा उल्लेख करीत भाजपला घरचा आहेर दिला होता.

महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाच्या मंत्र्याने टीका केल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला टोला लागवल्याची चर्चा शहरात रंगली आहे. आता राज्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शिवसेनेच्या सोबत असताना राष्ट्रवादीनेही रस्त्यांच्या दुरावस्थेविषयी विधान करीत सेनेला घरचा आहेर दिला आहे. प्रशासनाकडून रस्त्यावरील खड्ड्यांची म्हणावी तशी दखल घेतली जात नसल्याने प्रशासनाच्या वर्मावर बोट ठेवत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर देखील उपस्थित होते.