सीमावाद न्यायालयात असेपर्यंत हा भाग केंद्रशासीत केला जावा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बातमी महाराष्ट्र

सीमावाद न्यायालयात असेपर्यंत हा भाग केंद्रशासीत केला जावा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कर्नाटकातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा यासाठी केंद्राकडे सर्वपक्षीयांनी एकजुटीने आणि आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना, कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले आहेत, ते थांबवावे लागेल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात यावा. त्यासाठी समन्वयक मंत्री आणि सीमा प्रश्न कक्ष यांनी वकील आणि विविध घटकांचा समन्वय करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील उच्चाधिकारी समितीची बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अथितीगृह येथे झाली. यावेळी ते बोलत होते. एखादा प्रश्न न्यायालयात असेपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवली पाहिजे. परंतु, कर्नाटक सरकारने बेळगावचे नामांतर, उपराजधानीचा दर्जा तसेच तेथे विधानसौदाची उभारणी करुन न्यायालयाचा अवमान करण्याचे काम केले आहे. त्यामुळे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सीमावादाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हा भाग केंद्रशासीत केला जावा, अशी भूमिका यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडली.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, दोन राज्यांचा वाद न्यायालयात असेल, तर त्यामध्ये केंद्राने पालकाची आणि नि:पक्षपाती भूमिका घेणे अपेक्षित आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असतानाही कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले आहे. त्यामुळे या प्रश्नाचा निकाल लागेपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्यासाठी तातडीने पाठपुरावा करावा लागेल. हा मराठी भाग लवकरात लवकर महाराष्ट्रात यावा यासाठी सर्वांनीच सर्व भेद, वाद विसरून एकत्र येऊन काम करावे लागेल. तसेच, राज्यातील सर्वपक्षीयांनी एकजुटीने केंद्राकडे हा भाग मराठीच आणि महाराष्ट्राचाच असल्याचे आक्रमकपणे मांडावे लागेल. सीमाप्रश्नाचा न्यायालयातील पाठपुरावा सातत्यपूर्णरित्या व्हावा यासाठी सीमाप्रश्न कक्ष आणि विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे लागेल.” असेही ते यावेळी म्हणाले.

सीमाप्रश्नातील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड.शिवाजी जाधव, सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ विधीज्ञ अॅड.राजू रामचंद्रन दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीत सीमाप्रश्न कक्षाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी प्रास्ताविक केले न्यायालयीन लढा, तसेच या प्रश्नासंदर्भात विविध पातळ्यांवर करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. सीमाप्रश्नातील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड.शिवाजी जाधव, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी आदींनीही चर्चेत विविध मुद्द्यांची मांडणी केली.