फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; या विषयावर चर्चा झाल्याचा अंदाज
राजकारण

फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; या विषयावर चर्चा झाल्याचा अंदाज

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज(ता. ३१) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचा फोटो ट्विट करून, माहिती दिली आहे. माजी केंद्रीयमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. असं फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शरद पवारांवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी अनेकदा विविध कारणांसाठी त्यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे आता फडणवीसांनी देखील पवारांची भेट घेतली असल्याचं एक कारण सांगितलं जात आहे. याशिवाय राज्यात सध्या मराठा आरक्षण व अनेक महत्वाचे मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने याबाबतही या भेटीत चर्चा झाली असावी असंही बोललं जात आहे.

राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आणणारी ही बातमी असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्व पुनर्विचार याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली, त्या पार्श्वभूमीवरही चर्चा झाली असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.