उशिरा का होईना, बाहेर उभे आंबेडकर आज माझे दार ठोठावत होते
ब्लॉग

उशिरा का होईना, बाहेर उभे आंबेडकर आज माझे दार ठोठावत होते

जन्म तथाकथित उच्चवर्णिय मराठा कुटुंबातला व लहानपण साऊथ मुंबईत लालबाग-परळसारख्या शिवसेनेच्या बालेकिल्यात गेल्याने त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर नावाची व्यक्ती कधी परिचयाला आलिच नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पलिकडच्या त्या बी. आय. टी. चाळींमधे कुणी आंबेडकरवाले राहतात एवढीच पुसटशी कल्पना होती. त्यानंतर दादरच्या रुईयासारख्या प्रथितयश कॉलेजमधे अॅडमिशन घेतल्यावर तेथिल कट्ट्यावर आंबेडकर डिस्कस होणे ही बाब तर दूरचिच. आंबेडकर जयंतीला एखाद्या गल्लीतून मिरवणूक जात असेल तर “अरे तिकडून ते जय भीम लोक चाललेत, आपण ईकडून जाऊया” असे एकमेकांना सांगत त्या गल्ल्या टाळत जाणारे आम्ही आई-बाप-नातेवाईकांकडून वारश्याने आलेला पांढरपेशेपणा जपत होतो. मोठे होत असताना दिवाळी पहाटेला मिलिंद ईंगळेचा ‘गारवा’, इतर सणासुदीला बाबुजी फडकेंचे गीतरामायण, शनिवार-रविवारी फॅमिलीबरोबर प्रशांत दामलेचे ‘एका लग्नाची गोष्ट’ किंवा शाहरुख-काजोलचा डीडीएलजे आमची सांस्क्रृतिक तहान भागवायला पुरेसे होते. आजी, आई, मावशीसाठी तर ‘अवंतिका’ची म्रृणाल देव-कुळकर्णी हीच काय ती स्रीवादी, विद्रोही-वगैरे वगैरे.

मला पहिल्यांदा आंबेडकर वाचायला मिळाले ते सोशल मिडियातूनच. त्यावेळी फेसबुक भरात येत होते. अनेक चळवळीतले लेखक, कवि, विचारवंत, नाटककार भरभरून लिहित होते. त्यांना जोड आंबेडकरी विचारांची व लेखनाची होती. आपण काहितरी वेगळं वाचतोय याची जाणिव त्यावेळी होवू लागली. ते वापरत असलेले शब्द मी यापुर्वी कधी ऐकले नव्हते. ते लिहत असलेल्या कविता मनात अस्वस्थता निर्माण करत होत्या. ते मांडत असलेले वास्तव हे सत्य म्हणून स्विकारणे जड जात होते. हे लोक वेगळे आहेत व माझ्या आजूबाजूला, बिल्डिंगमधे, समाजामधे राहत असलेले लोक वेगळे आहेत याची जाणिव तेव्हा होवू लागली. मग मी सुद्धा आंबेडकरांना वाचू लागले. यु-ट्युबरवर अनेक वक्त्यांनी त्यांच्या भाषणामधे केलेली आंबेडरवादाची चिकित्साही ऐकली. प्रत्येक क्षणी आपण काहीतरी लॉजिकल, वैचारिकद्रृष्ट्या सम्रृद्ध करणारे आणि क्रांतिकारी ऐकतोय याचा साक्षात्कार होत गेला.

आंबेडकरांनी समाजशास्र,कायदा, राजकारण, अर्थशास्र, चळवळ, आंतरराष्ट्रीय संबंध याविषयी केलेले सखोल विवेचन त्यांच्या विद्वत्तेचे दर्शन पदोपदी घडवत होते. स्त्रीहक्क व स्त्री-स्वातंत्र्यसाठी आंबेडकरांनी केलेले कार्य व त्यांनी आम्हाला दिलेले अधिकार यावरील लिखाण वाचनात आल्यावर त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला. फेसबुकवर प्रस्थापितांच्या मानबिंदूंची चिकित्सा करणारी पहिली पोस्ट टाकण्याचा आत्मविश्वास मला आंबेडकरांनीच दिला. तेव्हापासून बरं-वाईट कसंही असो पण लिहितेच आहे. आंबेडकरांनी माझ्यासाठी दिलेला तो मोकळा श्वास आहे.

आज सकाळी बाजारातून मच्छी घेवून घरी आले तर माझे आई-पप्पा कलर्स मराठीवर ‘जलसा महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम बघत बसले होते. शाहिर संभाजी भगतांची मुलाखत सुरु होती. शाहिर प्रश्न विचारत होते की, “ज्या रामाला झालेल्या १४ वर्षांचा वनवास पाहून जर एका कविला रामायण लिहावेसे वाटत असेल तर जो समाज शतकानुशतके वनवासात राहिला त्याची गोष्ट सांगायला समाजातला एकही महाकवि का पुढे आला नाही? “शाहिरांच्या या प्रश्नाला उत्तर नव्हते. वडिलांनी गिळलेला आवंढा माझ्या नजरेतून सुटला नाही. डोळ्याच्या ओल्या झालेल्या कडा हळूच पुसत आई किचनमधे पळाली. उशिरा का होईना, बाहेर उभे आंबेडकर आज माझे दार ठोठावत होते.