आषाढी, कार्तिकीनंतर आता माघी वारीवरही कोरोनाचे सावट; पंढरपुरात संचारबंदीचे आदेश लागू
कोरोना इम्पॅक्ट

आषाढी, कार्तिकीनंतर आता माघी वारीवरही कोरोनाचे सावट; पंढरपुरात संचारबंदीचे आदेश लागू

पंढरपूर : कोरोनाच्या विषाणूच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आषाढी, कार्तिकी पाठोपाठ माघी एकादशीच्या यात्रेवर निर्बंध घालण्यात आले आहे. पंढरपुरात येणाऱ्या दिंड्यांना प्रतिबंध घालण्यात आला असून, विठ्ठल दर्शनही बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लाखो वैष्णव भक्तांची यंदाची माघी वारी देखील चुकणार आहे. तसेच शहरात २४ तास संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत. २३ फेब्रुवारी रोजी माघी एकादशी आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माघी वारीवरही निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता एकादशीला म्हणजेच २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ ते २३ फेब्रुवारी रात्री बारापर्यंत पंढरपूर शहरासह शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी, गोपाळपुर, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी, चिंचोली भोसे, भटुंबरे अशा गावातही संचारबंदीचे आदेश दिले आहेत. खरतरं, वारकरी संप्रदायामध्ये आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे पहिल्यांदा चैत्र वारी रद्द झाली. त्यानंतर आषाढी, कार्तिकी आणि आता माघी वारी रद्द करावी लागली.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार, श्री विठ्ठल आणि रूक्मिणीमातेचे मुखदर्शन दशमी म्हणजेच २२ आणि एकादशी म्हणजेच २३ फेब्रुवारी असे दोन दिवस विठ्ठलाचे मुखदर्शन सामान्य भाविकांना पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच माघी वारीसाठी पंढरपूर कडे येणाऱ्या पायी दिंड्यांना अटकाव करणे, शहरातील मठ धर्मशाळा मध्ये भाविकांना वास्तव्य करू न देणे, असेही आदेश यानिमित्ताने काढण्यात आले आहेत.

शहरात दूरवरचे ठिकाण निश्चीत करुन एसटी सेवेतील प्रवासी वाहतूक सुरळीत चालू ठेवण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. परंतु या प्रवासी सेवेतून येणाऱ्या भाविकांना मंदिराकडे तथा शहरात प्रवेश नसेल. ही सेवा केवळ तातडीची आपत्कालीन सेवा राहील. असेही जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.