10वी आणि 12 वीचे वर्ग वगळून इतर सर्व शाळा 20 मार्चपर्यंत बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कोरोना इम्पॅक्ट

10वी आणि 12 वीचे वर्ग वगळून इतर सर्व शाळा 20 मार्चपर्यंत बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील (महानगर पालिका क्षेत्र वगळुन) इयता 10वी आणि 12 वीचे वर्ग वगळून 20 मार्चपर्यंत सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा बंद करण्यात येत आहेत, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिलेल्या आदेशानुसार, इयत्ता 10 वी व 12 वीचे वर्ग नियमित सुरु ठेऊन सदरील विद्यार्थ्यांची दररोज थर्मल गन व ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करुन त्यांची विद्यार्थीनिहाय नोंद ठेवण्यात यावी. सर्व शिक्षकांनी दर आठवडयाला RT-PCR चाचणी करणे बंधनकारक राहील. इयत्ता 10 वी आणि 12 वीचे वर्ग नियमित सुरु असल्याने संदर्भीय शासन परिपत्रकामधील सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य राहील. 100% शिक्षकांच्या उपस्थितीचा अनावश्यक आग्रह शाळा व्यवस्थापनाने करु नये.

जर एखाद्या शाळेत, महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अथवा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास सदर शाळा, महाविद्यालय किमान चार दिवसांसाठी बंद ठेवण्यात यावे. सर्व शिक्षकांची RT-PCR चाचणी करण्यात यावी व अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत शाळा सुरु करण्यात येऊ नयेत. पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग पुर्वीप्रमाणे ऑनलाईन व दुरस्थ पद्धतीने सुरु ठेवण्यात येत आहे. इ.10 व इ.12 वीच्या वर्गावरील अध्यापन करणारे शिक्षक वगळुन इतर वर्गावरील शिक्षकांची 50% उपस्थिती अनिवार्य राहील.

10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मास्क परिधान केल्याशिवाय शाळेत प्रवेश देण्यात येऊ नये. तसेच हात धुणे, सामाजिक अंतर राखणे आणि शाळा इमारतींचे निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य राहील. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्‍यास संबंधितावर आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005 चे कलम 51 व 56 अन्‍वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही डॉ. गव्हाणे यांनी आदेशात नमूद केले आहे.