मोठी बातमी : १ मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांना मिळणार कोरोना लस
कोरोना इम्पॅक्ट

मोठी बातमी : १ मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांना मिळणार कोरोना लस

नवी दिल्ली : देशभरात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले. यानंतर आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. येत्या १ मार्चपासून देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोनावरील लसीकरण सुरू करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. यात 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आल्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याबाबत बोलताना प्रकाश जावडेकर म्हणाले की, येत्या १ मार्चपासून देशातील ६० वर्षांवरील नागरिकांना आणि गंभीर समस्यांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. यात 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. विशेष म्हणजे सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल. 10 हजार सरकारी, तर 20 हजार खासगी केंद्रांवर कोरोना लस उपलब्ध असेल. देशभरातील १० हजार सरकारी आणि २० हजार खासगी केंद्रांमधून हे लसीकरण केले जाईल.

त्याचबरोबर, 45 वर्षांवरील सहव्याधी (कोमॉर्बिडीटीज) असलेल्या नागरिकांनाही लस दिली जाणार आहे. ज्या व्यक्तींना सरकारी केंद्रांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी कोव्हिड लस घ्यायची असेल, त्यांना लसीचे पैसे मोजावे लागतील. त्या लसीचे दर केंद्रीय आरोग्य मंत्री येत्या तीन-चार दिवसात रुग्णालय प्रशासनांशी बोलून ठरवतील, अशी माहितीही जावडेकरांनी दिली.

दरम्यान, आतापर्यंत एकूण 5 लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्संना कोरोना लस देण्यात आली आहे. यानंतर राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोना लसीकरण सुरु आहे. जवळपास 652 केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जात आहे. तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील व्यक्तींना लसीकरण केले जाणार असून त्याची नोंदणी साधारणपणे 1 मार्चपासून होऊ शकते, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते की, राज्यात दररोज साधारणपणे 40 ते 45 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जात आहे. राज्यात केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे कोरोना लसीकरण सुरु आहे. मात्र प्रत्येक आठवड्याला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे.

या पार्श्वभूमीवर कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना मान्यता देण्यात आल्यानंतर भारतामध्ये १६ जानेवारीपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.