आरोग्यमंत्र्यांची भावनिक साद; हे तुमचं बागडण्याचं, खेळण्याचं आणि मैदानावर घाम गाळण्याचं वय, पण…
कोरोना इम्पॅक्ट

आरोग्यमंत्र्यांची भावनिक साद; हे तुमचं बागडण्याचं, खेळण्याचं आणि मैदानावर घाम गाळण्याचं वय, पण…

मुंबई : राज्यात कोरोनानं पुन्हा थैमान घालायला सुरवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना टाळण्यासाठी मास्क घाला, शिस्त पाळा अन्यथा लॉकडाऊन करू असं सांगत पुढील ८ दिवस महत्त्वाचे असल्याचा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तर दुसरीकडे राज्यसरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री देखील राजेश टोपे यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, ते रुग्णालयात उपचार घेत असून तेथूनच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी भावनिक पत्र लिहलंय. राजेश टोपे यांनी एक दिवसापूर्वीच हॉस्पिटलमधून जनतेला पत्र पाठवलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काय लिहिले आहे राजेश टोपे यांनी पत्रात
पत्रात राजेश टोपे यांनी म्हंटल आहे की, ”गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत, शासनाची खंबीर भूमिका ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोना योद्धे, विशेषत: डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करू शकलो, मात्र अद्यापही कोरोना गेलेला नाही, तो पुन्हा डोके वर काढत आहे, तेव्हा पुन्हा एकदा सामुहिक लढाई लढावी लागणार आहे.

शाळा अन् महाविद्यालये नुकतेच सुरु झाले असून कोरोना वाढताना दिसत आहे. तुमचं बागडण्याचं, खेळण्याचं आणि मैदानावर घाम गाळण्याचं वय असूनही गेल्या वर्षभरापासून आपण घरीच बसून आहात. कोरोनावर मात करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे, सर्वप्रथम तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. तसेच, आई-वडिल, भाऊ-बहिणी आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी. बाहेरुन आल्यानंतर तोंड-हात पाय धुतले जातात का, मास्क वापरला जातो का, कोरोनाच्या नियमावलीचे पालन केले जाते का, हे तुम्ही काळजीपूर्वक पाहा. कोरोनाची काही लक्षणे दिसल्यास संबंधित सदस्याला तत्काळ सरकारी रुग्णालयात घेऊन जा. मित्रांनो, आजचा विद्यार्थी देशाचा उद्याचा आधारस्तंभ आहे, तरुणाचं मन सकारात्मक, बुद्धी सतेच आणि शरीर सदृढ पाहिजे, तरच त्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतात. तर, मग चला मला मदत करणार ना, मला तुमची खात्री आहे. आपण, ही लढाई नक्की जिंकू…. असे भावनिक आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.