जनतेच्या आरोग्याशी तडजोड नको; ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करावा
कोरोना इम्पॅक्ट

जनतेच्या आरोग्याशी तडजोड नको; ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करावा

नवी दिल्ली : भारताच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. परंतु ब्रिटनमध्येच कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. “प्रजासत्ताक दिनाच्या जवळपास या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं जनतेचं आरोग्य आहे, त्याच्याशी तडजोड नको.” असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘एबीपी माझा वृत्तवाहिनीशी पृथ्वीराज चव्हाण यांनी संवाद साधला, यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोना व्हायरससह काँग्रेसमधील काही नेत्यांनी सोनिया गांधींनी लिहिलेलं पत्र, काँग्रेसअंतर्गत निवडणुकीबाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, “युरोपमधल्या बहुतेक देशांनी इंग्लंडमधून येणाऱ्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. जोपर्यंत नव्या विषाणूचं स्वरुप आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपणही तातडीने हवाई वाहतूक स्थगित केली पाहिजे. तिथले आरोग्यमंत्री संसदेत म्हणत आहेत की हा विषाणू आऊट ऑफ कंट्रोल झाला आहे. आपण हे वक्तव्य गांभीर्याने घेतलं पाहिजे. बैठकीचा घोळ न लावता ही बंदी घातली पाहिजे. जे लोक आधी आले आहेत त्यांना क्वॉरन्टाईन केलं पाहिजे.”

दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आला आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 1000 रुग्णांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान, या विषाणूचा संसर्ग वाढत जरी असला, तरी हा विषाणू आधीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत कमी संहारक आहे. तशी माहिती ब्रिटिश वैज्ञानिकांनी दिली आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तिथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी घातली आहे. शिवाय रविवारपासूनच ब्रिटनमध्ये सक्तीचं लॉकडाऊनही लागू करण्यात आलं आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका वर्षात कोविड -19 ला सामोरे जाण्यासाठी जे महत्वाचे होते, त्या सर्व गोष्टी सरकारने केल्या आहेत. अशातच, ब्रिटनमध्ये अडलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या (स्ट्रेन) संसर्गाबाबत सरकार सतर्क असून घाबरून जाण्याची गरज नाही.

खबरदारी म्हणून ट्रान्झिट फ्लाईटसमधून ब्रिटनवरून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर अनिवार्य आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागणार आहे. नव्या करोना स्ट्रेनचा फैलाव रोखण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आलाय. २२ डिसेंबर रोजी रात्री ११.५९ पूर्वी टेक ऑफ केलेल्या विमानांतील प्रवाशांना भारतात आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागेल.

तसेच, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही ब्रिटनच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. ते नवीन विषाणू संदर्भातील विश्लेषण आणि चालू असलेल्या संशोधनाची माहिती आम्हाला देत आहेत. यासंदर्भात आम्ही लोकांना अद्यायावत करत आहोत. आम्ही नवीन कोरोना विषयी जाणून घेत असून लवकरच या व्हेरिएंटच्या वैशिष्ट्यांचे स्पष्ट चित्र असेल.