संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांना भारताकडून दोन लाख कोरोना लसीचे डोस
कोरोना इम्पॅक्ट

संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांना भारताकडून दोन लाख कोरोना लसीचे डोस

कोरोना महामारीच्या लढाईत भारताने कोरोना लसीच्या माध्यमातून जगाला आशेचा किरण दाखविला आहे. मात्र भारतात पुन्हा कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत देशालाच खरी गरज असताना भारताने जगाशी असलेले देणे न विसरता कोरोना लस विविध देशांना पुरवत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांना भारताने दोन लाख कोरोना लसीचे डोस दिले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसच्या विरोधात जागतिक लढाईत कोरोना लसीच्या अत्यावश्यक पुरवठ्याच्या प्रयत्नांसाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटारेस यांनी भारताची स्तुती केली आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी़ एस़ तिरुमूर्ति यांनी शनिवारी ट्विट करून यांची माहिती दिली. गुटारेस यांनी 17 फेब्रुवारीला भारताला आभारप्रदर्शन करणारे पत्र पाठविले. यामध्ये त्यांनी कोरोना लढ्यासाठी भारताने 2 लाख डोस दिले, याबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वैयक्तीक आभार मानले आहेत.

तिरुमूर्ति यांनीदेखील संयुक्त राष्ट्र प्रमुखांचे आभार व्यक्त केले आहेत. ट्विट करत तिरुमूर्ति यांनी म्हंटले आहे की, ”कोरोना महामारीविरोधात लढण्यात भारत एक जागतिक नेता बनला आहे. 150 पेक्षा अधिक देशांना महत्वाची औषधे, किट आणि व्हेंटिलेटर तसेच वैयक्तिक सुरक्षा उपकरणे देऊन भारताने जागतिक महामारीविरोधात लढण्याच्या प्रयत्नांना बळ दिले आहे. यामुळे भारत हा खरोखरच जागतिक नेता बनला आहे, असे गुटारेस यांनी पत्रात म्हटले आहे.”

दरम्यान, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी, काही दिवसांपूर्वी युएनच्या बैठकीत या शांतीदुतांना 2 लाख कोरोना लसीचे डोस भेट म्हणून देणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी भगवतगीतेचा उल्लेख करत नेहमी दुसऱ्यांच्या कल्याणाची बाब मनात ठेवून आपले काम करावे, असेही म्हटले होते. तथापि, जगभरात एकूण 12 मोहिमांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे एकूण 94,484 कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये 121 देशांचे लोक काम करतात. ज्यामध्ये सर्वाधिक सैनिक हे भारताचे आहेत.