कंगना संतापली; आता थेट ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सीवरचं साधला निशाणा
मनोरंजन

कंगना संतापली; आता थेट ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सीवरचं साधला निशाणा

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत कधी कोणाला काय बोलेल याचा आता कोणताच अंदाज लावता येणार नाही. दिल्लीतील शेतकरी आंदोलक, पंजाबी गायक दिलजित दोसांज यांच्यानंतर कंगनाने आता थेट ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांच्यावर निशाना साधला आहे. कंगनाने जॅक डोर्सी यांचे 5 वर्षांपूर्वीचे ट्विट शोधून त्यांच्यावर मुस्लिम राष्ट्र आणि चीनी खुशमस्क-यांना विकले गेल्याचा आरोप केला. ट्विटरने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट बंद केल्याच्या रागात कंगनाने हा आरोप केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद केल्याने कंगनाने जॅक डोर्सी यांंचे 5 वर्षांपूर्वीचे ट्विट शोधून काढले. ‘ट्विटर अभिव्यक्ति स्वातंत्र्यासोबत आहे. सत्य बोलणा-याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत,’असे ट्विट जॅक डोर्सी यांनी 5 वर्षांपूर्वी केले होते. मात्र कंगनाने त्यांच्या या ट्विट आणि एकूणच ट्विटरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या ट्विटवर तिने लिहिले आहे की, ‘तुम्ही अजिबात अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा पुरस्कार करत नाही. मुस्लिम राष्ट्र आणि चीनी खुशमस्क-यांनी तुम्हाला पूर्णपणे खरेदी केले आहे. तुम्ही फक्त फायद्यासाठी काम करता. अशा लोकांव्यतिरिक्त अन्य लोकांसोबत तुम्ही पक्षपातीपणाने वागता. तुम्ही लोभाचे गुलाम बनले आहात. पुन्हा असले दावे करू नका, हे लाजीरवाणे वाटते,’ अशा शब्दांत कंगनाने जॅक यांना सुनावले.

कंगना राणौतने याआधीही अनेकदा ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आगपाखड केली आहे. कंगना व तिची बहीण रंगोली या दोघींच्या ट्विटर अकाऊंटविरोधातही अनेकदा ट्विटरने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे कंगनाचा ट्विटरवर विशेष राग आहे. पण दुसरीकडे या सोशल प्लॅटफॉर्मवर कंगना प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार होत असतानाच मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांच्या सोशल मीडिया वापरावरही निर्बंध आणण्यात आले आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्राममागोमाग आता ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरही कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेतील संसदेवरील हल्ला आणि हिंसाचाराच्या घटनेमुळे जागतिक राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असतानाच आता त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पाठोपाठ ट्विटरनेही त्यांचे अकाऊंट बंद केले आहे.