या पालकांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत:  उद्धव ठाकरे
बातमी महाराष्ट्र

या पालकांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत: उद्धव ठाकरे

नागपूर : भंडारा जिल्हा रुग्णालयास लागलेल्या आगीत आपली बाळं गमावलेल्या मातांच्या सांत्वनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वतः भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत आले! अशा भीषण दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रच जणू आपल्या पाठीशी असल्याचा दिलासा आज या दोन्ही मातांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः भेटून दिला! या पालकांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत इतकं हे प्रचंड दुःख आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भंडारा येथील या भीषण घटनेत भोजापूर जवळच्या सोनझारी येथील गीता बेहरे यांची अवघ्या महिनाभराची मुलगी दगावली. शहराजवळ असलेल्या भोजापूर गावातील सोनझारी ही अवघ्या पाचसहाशेची वस्ती. या वस्तीत बेहरे कुटुंबीय राहतात. मोलमजुरी करून ते आपली उपजीविका करतात. गीता आणि विश्वनाथ यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झालेला. मृत बालिका हे त्यांचे पहिलेच अपत्य. जन्मत:च बाळाचे वजन अत्यंत कमी असल्याने तिला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथे गेले दोन महिने तिच्यावर उपचार सुरू होते. चांगल्या उपचारांमुळे तिच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती.

अशीच परिस्थिती सीतेकसा येथील कविता बारेलाल कुमरे या मातेची. तीसुद्धा मोलमजुरी करून स्वतःचा निर्वाह करते. गेल्या महिन्यात सात तारखेला तिच्या संसारवेलीवर पहिलेवहिले पुष्प उमलले. मात्र या मुलीचे वजन कमी असल्याने तिला उपचारासाठी भंडारा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचीही प्रकृती सुधारली होती आणि लवकरच तिला डिस्चार्ज मिळणार होता. मात्र काल पहाटे आलेल्या त्या दुर्दैवी निरोपाने सर्वस्व हिरावले गेल्याची अत्यंत दुःखद जाणीव या दोघींना झाली. त्यांना फार मोठा मानसिक धक्का बसला आहे.

या भेटीदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला महत्त्वाचे निर्देशही दिले. ”राज्यातील सर्वसामान्य जनता शासकीय रुग्णालयात विश्वासाने येत असून त्यांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, याची खबरदारी घ्या. शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकही जीव जाता कामा नये, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

तसेच, राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट सक्तीचे केले जाणार. संपूर्ण जळीत प्रकरणाची विशेष चौकशी करुन दोषींविरुद्ध कारवाई करणार असल्याची त्यांनी यावेळी ग्वाही दिली. त्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती. राज्यातील इतर रुग्णालयांतही या समितीने सूचविलेल्या सूचना लागू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.