देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंचा उपोषणाचा निर्णय मागे
बातमी महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंचा उपोषणाचा निर्णय मागे

राळेगणसिध्दी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारीपासून शेतकर-यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. मात्र आता त्यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला आहे. अण्णा हजारे हे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, स्वामीनाथन आयोगाची अंमबजावणी करावी, या व शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या पार्श्वभूमीवर आज दुपारी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री राधाकृष्ण विखे, गिरीश महाजन, बबनराव पाचपुते यांनी अण्णांची राळेगणसिध्दीत भेट घेतली. केंद्राने अण्णांच्या मागण्यांसंदर्भात उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापना करुन त्यात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

अण्णा हजारे म्हणाले, केंद्राला सूचविलेल्या मुद्यांना उशीर झाला. तो त्यांनी मान्य केला. मी केंद्राला १५ मुद्दे सुचविले होते. हे मुद्दे आता कमिटीच्या माध्यमातून सोडविले जातील. हे प्रश्न सुटले तर शेतक-यांना दिलासा मिळेल. आज दिलेल्या आश्वासनामुळे मी उपोषण मागे घेतले आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अण्णा हजारेंच्या भेटीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे अण्णांनी सुचिवलेल्या प्रश्नांना उशीर झाला. आता अण्णांनी केलेल्या मागणीनुसार केंद्रात उच्चस्तरीय कमिटी स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्लीत बैठक आयोजित करणार असून यावेळी अण्णा हजारे हेही उपस्थित राहतील. समितीतील सदस्यही अण्णाच सुचवतील.

तर कृषी राज्यमंत्री चौधरी म्हणाले, शेतक-यांच्या विविध प्रश्नांबाबत अण्णांच्या प्रत्राची केंद्राने वेळवेळी दखल घेतली आहे. त्यात अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी जे प्रश्न आहेत, ते कमिटीच्या माध्यमातून सोडविले जातील.