शेतकरी आंदोलनाला अण्णा हजारेंचा पाठिंबा; म्हणतात…
देश बातमी

शेतकरी आंदोलनाला अण्णा हजारेंचा पाठिंबा; म्हणतात…

नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पाठिंबा दिला असून दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन देशभर पसरलं पाहिजे असं त्यांनी म्हटले आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी आज भारत बंदची हाक दिली असून देशभरात बंद पाळला जात आहे. या बंदच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अण्णा हजारे म्हणाले, मी सर्व भारतीयांना आवाहन करतो की सध्या जे आंदोलन दिल्लीत सुरू आहे, ते आंदोलन संपूर्ण भारतभरात परसण्यासाठी साऱ्यांनी सहभागी व्हा. केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी सर्व ठिकाणच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. असं घडलं तरच सरकारवर दडपण येईल. पण रस्त्यावर उतरून आंदोलन करताना एका गोष्टीचं भान ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे की कोणत्याही प्रकारचा हिंसक प्रकार घडून द्यायचा नाही. सरकार केवळ आश्वासनं देतं पण मागण्या कधीच पूर्ण करत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मी आधीही पाठिंबा दिला होता आणि आताही पाठिंबा देत राहीन, असे अण्णांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, केंद्रातील एनडीए सरकारने पारित केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मोदी सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यामध्ये सातत्याने बैठका सुरू आहेत, पण त्यातून अद्यापही तोडगा निघालेला नाही.