सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाच्या परीक्षांबाबत केंद्राचा मोठा निर्णय 
देश बातमी

सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाच्या परीक्षांबाबत केंद्राचा मोठा निर्णय 

नवी दिल्ली : जानेवारी किंवा फेब्रवारीमध्ये सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शैक्षणिक क्षेत्रावरही यांचा मोठा परिणाम झाला आहे. अशातच, सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाचे पेपर नेमके कधी होणार? याबाबत विद्यार्थ्याना प्रश्न पडला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र जानेवारी किंवा फेब्रवारीमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाही, असे डॉ. रमेश पोखरीयाल यांनी स्पष्ट केल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत बोलताना पोखरीयाल म्हणाले, दरवर्षी 15 फ्रेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षांचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जानेवारी-फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेणे शक्य नाही. परीक्षा कधी घेता येईल याविषयी विचार-विनीमय केल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. परीक्षेविषयीची सर्व माहिती वेळोवेळी विद्यार्थ्यांना दिली जाईल.

दरम्यान, देशभरातील शिक्षकांशी ऑनलाईन शिक्षणाशी संवाद साधल्यानंतर कोरोना व्हायरस संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सीबीएसई बोर्डने 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, कोरोनाच्या संसर्ग वाढत असताना ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. त्यात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करता यावा व विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी महत्वाचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे.

लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा भार येऊ नये यासाठी सीबीएसई इयत्ता 9 ते 12 चा अभ्यासक्रम 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी 30 टक्के कमी करणार असून महत्त्वाच्या विषयांच्या कन्स्पेट अभ्यासक्रमात राहणार आहेत.