मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांचा विविध घोषणांचा पाऊस
बातमी मराठवाडा

मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांचा विविध घोषणांचा पाऊस

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्यानिमित्त औरंगाबाद दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादनही केले. यावेळी बोलताना मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. मराठवाडा ही संतांची भूमी आहे. मराठवाड्याचं वेगळेपण काय आहे. त्यासाठी संतपीठ हे काही वर्षांपासून चर्चेत होतं. ते संतपीठ आपण स्थापन करत आहोत. त्या संतपीठात आपल्या संतांची शिकवणूक दिली जाईल, असे ते बोलले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तसेच, निजामशाहीच्या काही खुणा आहेत. निजामशाहीच्या काळातल्या शाळा आता पडायला आलेल्या आहेत. ही काही वैभवशाली परंपरा नाही. म्हणून मराठवाड्यातल्या सुमारे १५० शाळांचा आपण पुनर्विकास करत आहोत. आम्हाला त्या शाळा नको आहेत. मराठवाडा जगाला देऊ शकतो, अशा काही गोष्टी आपण आज मराठवाड्यात सुरू करत आहोत. मराठवाड्यातल्या शाळांचं रुप अभिमान वाटला पाहिजे, असं करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

सध्या आरोग्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यासाठी परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण सुरू करतोय. काहीजण असं म्हणतील की मुख्यमंत्री आले, इतकी कामं जाहीर केली, पण पुढे काय होणार? पुढे त्याचा शुभारंभ झाल्यावर त्याचं लोकार्पण होणार. आज ज्या काही करता येण्यासारख्या गोष्टी आहेत, त्याच मी जाहीर करतोय. पण इतर मोठे विषय देखील आपण मार्गी लावत आहोत. संभाजीनगरची पाणीपुरवठा योजना कित्येक वर्ष आपण फक्त बोलत होतो. अनेकजण आले आणि बोलून गेले. शिवसेना, शिवसेनाप्रमुख आणि संभाजीनगरचं वेगळं नातं आहे. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी मराठवाड्याला दिलेली वचनं जनतेच्या भल्यासाठी होती आणि ती पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी जाहीर केलेल्या इतर घोषणा!
१. हिंगोली येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी ६ कोटी निधी
२. औरंगाबाद -अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना
३. औरंगाबाद – शिर्डी हवाई सेवेची चाचपणी
४. सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी ३८२ कोटी रुपये
५. औरंगाबाद : मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७. २२ कोटी रुपये निधी नगरोत्थानमधून
६. परभणी शहरात भूयारी गटार योजनेच्या कामासही गती. ३५० कोटी रुपयांची तरतूद
७. परभणीसाठी जल जीवन अभियानातून अतिरिक्त पाणी पुरवठा योजना. १०५ कोटी रुपये
८. उस्मानाबाद शहरासाठी 168.61 कोटी रकमेची भूमीगत गटार योजना
९. औरंगाबाद : १६८० कोटींच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश
१०. हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योग. ४.५० कोटी
११. औरंगाबाद – शिर्डी या ११२. ४० किमी मार्गाची श्रेणीवाढ
१२. समृद्धीला जोडणाऱ्या १९४.४८ कि.मी.च्या जालना- नांदेड महामार्गाला देखील गती देणार
१३. स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन प्रेरणादायी होईल असे उभारणार
१४. औरंगाबाद सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार
१५. मराठवाड्यात येत्या वर्षात जवळपास 200 मेगावॅट सौर प्रकल्प उभारणार
१६. औरंगाबाद शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रीया वेगाने करावी असे निर्देश
१७. घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास. वाढीव २८ कोटी रुपये खर्च
१८. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास. 86.19 कोटी रुपये खर्च येईल.
१९. नरसी नामदेव मंदिर परिसराचा विकास. 66.54 कोटी रुपये खर्च.