आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी; तर हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
बातमी मुंबई

आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी; तर हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. तर सध्या राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार पाहणारे हेमंत नगराळे आता नवे मुंबई पोलीस आयुक्त असतील. अशी माहिती आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर द्द्वारे दिली आहे. त्याचबरोबर, रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी दिली आहे. तर परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर आता परमबीर सिंह यांची बदली झाली आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुखांना हटविण्याची मागणी जोर धरत होती. तर दुसरीकडे पोलीस आयुक्तांना बदलण्याची चर्चा सुरु होती. या साऱ्या पार्शभूमीवर काल मध्यरात्रीपर्यंत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत हायव्होल्टेज बैठकी सुरु होत्या. या बैठकीला हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परबही उपस्थित होते. या बैठकीमध्ये सचिन वाझे प्रकरणावर दीर्घकाळ चर्चा पार पडली. मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या बैठकी नंतर मंत्री आणि पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावरून परतले होते.

हेमंत नगराळे यांनी २०१६ मध्ये प्रभात रंजन यांच्याकडून नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. आपल्या कारकीर्दीत नगराळे यांनी आयुक्तालयाचा कारभार उत्तम केला होता. मात्र, काही प्रकरणांमुळे त्यांचे नाव चर्चेतही होते. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली होती. त्यानंतर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांची जूलै २०१८ साली बदली झाली असून त्यांच्या जागेवर संजयकुमार यांची नियुक्ती करण्यात आली. नागराळे यांचा कार्यकाळ पूर्ण होऊन पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला होता. त्यांनी आपले वजन वापरून नवी मुंबईत ठाण मांडल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होत होती. आता ते राज्याच्या लीगल आणि टेक्निकल विभागाचे पोलीस महासंचालक पदी कार्यरत आहेत.

अनिल देशमुखांचे ट्वीट
पोलीस दलाबाबत सरकारचा मोठा निर्णय
– हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
– रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
– संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी
– परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जबाबदारी