कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग; प्रकरणाचे पडसाद विधानसभेत
बातमी महाराष्ट्र

कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग; प्रकरणाचे पडसाद विधानसभेत

मुंबई : कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली. या घटनेचे विधानसभेत पडसाद उमटले. सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. विनयभंगाचा प्रयत्न होणं, हे देखील वाईट कृत्य असल्याचं सांगत उपमुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटर्ससाठी महिला सुरक्षेच्या अनुषंगाने एसओपी लागू करण्यात येईल, अशी घोषणा केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोविड सेंटरमध्ये घडलेल्या घटनेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर निवेदन केलं. पवार म्हणाले, औरंगाबादमधील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या भगिनीसोबत घडलेली विनयभंगाच्या प्रयत्नाची घटना दुर्दैवी आहे. संबंधित भगिनीवर बलात्कार झालेला नाही. मात्र, विनयभंगाचा प्रयत्न होणे हे देखील वाईट कृत्य आहे. सरकारने ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेतली आहे. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे, असं अजित पवार म्हणाले.

राज्यातील कोव्हिड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी (मानक कार्यप्रणाली) तयार करण्यात येईल. त्याचबरोबर ती लागू करण्यात येईल. ही एसओपी राज्यातील सर्व कोव्हिड सेंटर्ससाठी बंधनकारक असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.