मुख्यमंत्री आक्रमक; आणखी किती बळी घेणार म्हणत फाडली कृषी कायद्याची प्रत
देश बातमी

मुख्यमंत्री आक्रमक; आणखी किती बळी घेणार म्हणत फाडली कृषी कायद्याची प्रत

नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आक्रमक झाले आहेत. आणखी किती बळी घेणार हा प्रश्न विचारत संतापलेल्या केजरीवाल यांनी कृषी कायद्याची प्रत दिल्लीच्या विधानसभेत फाडली. दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कृषी कायद्यांवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कडाडून टीका केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शेतकऱ्यांच्या आंदोलनात आत्तापर्यंत २० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. आपल्या देशातला शेतकरी हा भगत सिंह यांच्या प्रमाणे कायद्यांविरोधात आंदोलन करतो आहे. त्यामुळे मोदी सरकारने आता इंग्रजांपेक्षाही जास्त वाईटपणा करु नये असं म्हणत या कायद्यांवरुन अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बरेली येथे रॅली काढून तीन कृषी कायद्यांचे फायदे समजावून सांगितले. भाजपचे सगळे नेते हे पाठ केल्याप्रमाणे कृषी कायद्यांचे फायदे समजावून सांगत आहेत. शेतकरी देशात कुठेही त्याचा शेतमाल विकू शकतो. मात्र या सगळ्या हवेतल्या गप्पा आहेत. शेतकऱ्यांमध्ये कुणीही भ्रम पसरवलेला नाही. भाजपच्या नेत्यांमध्ये भ्रम पसरवण्यात आला असल्याचेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर, कोरोना काळात घाई घाईने हे तीन कायदे संमत करुन घेण्याची मोदी सरकारला काय गरज होती? असा प्रश्नही अरविंद केजरीवाल यांनी विचारला आहे. शेतकऱ्यांसाठी आणले गेलेले हे कायदे काळे कायदे आहेत. आम्ही त्यांचा धिक्कार करतो. दिल्ली राज्यात हे कायदे लागू होणार नाहीत असंही विधानसभेत अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं.