सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोनावरील नवीन लस लॉन्च करणार; अदर पूनावाला यांचे संकेत
देश बातमी

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोनावरील नवीन लस लॉन्च करणार; अदर पूनावाला यांचे संकेत

पुणे  : कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्ड लसीच्या वापरला परवानगी मिळाली आणि संपूर्ण देशाला या महामारीतून बाहेर पडण्याचा एक आशेचा किरण दिला. आता पुन्हा एकदा एक नवा आशेचा किरण दिसण्याची शक्यता आहे. ते म्हणजे, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लवकरच कोरोनावरील नवीन लस लॉन्च करण्याची शक्यता आहे. याबद्दलचे संकेत खुद्द सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात सर्वात आधी सीरमच्या कोविशील्ड लसीला परवानगी मिळाली. सीरमनं ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकाच्या सहाय्यानं कोविशील्ड लस तयार केली आहे. देशात सध्या ही लस वापरली जात आहे. त्यानंतर आता येत्या जून महिन्यापर्यंत सीरम कोरोनावरील दुसरी लस लॉन्च करेल, अशी माहिती पुनावाला यांनी ट्वीट करून दिली आहे. या लसीला मान्य दिल्यास ती देशातील तिसरी कोरोना लस ठरेल. असेही पुनावाला यांनी म्हंटले आहे.

‘सीरमनं नोवावॅक्ससोबतच्या भागिदारीतून तयार केलेल्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. त्याचे निष्कर्ष उत्तम आहेत. भारतात चाचण्या सुरू करण्यासाठी आम्ही परवानगी मागितली आहे. जून २०२१ मध्ये कोवोवॅक्स लॉन्च करू अशी आशा आहे,’ असं पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असा सिरम इन्स्टिट्यूटचा नावलौकिक आहे. काही दिवसांपूर्वीच सीरमने कोरोना प्रतिबंधक असलेली कोविशिल्ड लस देशभरात वितरणासाठी उपलब्ध करून दिली आहे. १६ जानेवारी पासून देशभरात कोविशील्डच्या लसीकरणाची मोहीम देशात सुरू आहे.

तर, दुसरीकडे सीरमची कोविशील्ड लसीसोबतच भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचा वापर देशात सुरू आहे. कोवॅक्सिनची निर्मिती हैदराबादस्थित भारत बायोटेकनं भारत वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीच्या सहकार्यानं केली आहे. कोवॅक्सिन लस पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. तर कोविशील्ड लसीसाठीचं संशोधन ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकानं केलं आहे. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया या लसीचं उत्पादन करत आहे.