काय करावं या लोकांचं? कोरोना रुग्णांसाठी पार्सलमधून दारू, कलिंगडातून गुटखा
बातमी विदर्भ

काय करावं या लोकांचं? कोरोना रुग्णांसाठी पार्सलमधून दारू, कलिंगडातून गुटखा

यवतमाळ : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. असे असतानाही व्यसन असलेले कोरोनाबाधित रुग्ण येणकेन प्रकारे व्यसनाचे साधन मिळवण्यासाठी धडपडत आहेत. यातूनच फळांचा रस असल्याचे सांगून दारूची आणि कलिंगडाच्या (टरबूज) आतून गुटख्याची (खर्रा) तस्करी करण्याचा प्रकार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत कोविड केअर सेंटरवर निदर्शनास आला. कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांनी हा प्रताप केला. परंतु रुग्णालय प्रशासनाने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या कोरोनाबाधित शौकिनांनी तलब भागवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी चक्क खर्रा पार्सल पाठवण्याचा प्रयत्न केला. तर काही जणांनी रुग्णांना पार्सलमधून विदेशी दारू पुरवण्याचा प्रयत्न केला. रुग्णांना दारू पाठवताना कोणाला शंका येऊ नये, यासाठी फळाचे ज्यूस किंवा घरचे जेवण आहे, असे वाटावे या पद्धतीने अ‍ॅल्युमिनिअमचे रॅपर असलेल्या पॅकेटमधून हे पार्सल दिले. परंतु सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने त्यांनी पार्सल उघडून पाहिले असता त्यात दारू असल्याचे समोर आले.

कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर हे रुग्ण उपचार घेतल्यानंतर बऱ्यापैकी धोक्यातून बाहेर आलेले असतात. त्यानंतर त्यांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात येते. त्याच ठिकाणी असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी ही अफलातून शक्कल लढवली होती. या प्रकाराने कोविड केअर सेंटरवर अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याची बाब पुढे आली आहे.