हेमंत बिस्वा शर्मा आसामचे नवे मुख्यमंत्री
देश बातमी

हेमंत बिस्वा शर्मा आसामचे नवे मुख्यमंत्री

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत भाजपने आसाममध्ये सत्ता राखली. मात्र, नवीन सरकार कुणाच्या नेतृत्वाखाली असेल, याबद्दल बरीच चर्चा सुरू होती. माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना कायम करणार की, हेमंत बिस्वा शर्मा यांना संधी मिळणार? अखेर हे चित्र रविवारी स्पष्ट झालं असून सोनावाल यांना बाजूला सारत हेमंत बिस्वा शर्मा हे आसामचे नवे मुख्यमंत्री हे निश्चित झालं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा पराभव करत निवडणुकीत विजय मिळवला. मात्र, ही निवडणूक लढवत असताना भाजपने मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबद्दल कोणतीही वाच्यता केली नव्हती. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि आसाम भाजपतील वजनदार नेते हेमंत बिस्वा शर्मा यांच्या नावाभोवतीच चर्चा सुरू होती. काल (ता. ८) दिल्लीत बैठक झाल्यानंतरही कोणतीही वाच्यता करण्यात आली नव्हती.

दरम्यान, रविवारी सकाळी सोनोवाल यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर भाजप संसदीय कार्यकारिणीची बैठक गुवाहाटी येथे पार पडली. या बैठकीत हेमंत बिस्वा शर्मा यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं आहे. या बैठकीला केंद्रीय कृषीमंत्री आणि भाजपचे नेते नरेंद्रसिंह तौमर, आसामचे पक्ष निरीक्षक अरूण सिंह हे उपस्थित होते.