मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणार नाही : राजनाथ सिंह
देश बातमी

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणार नाही : राजनाथ सिंह

नवी दिल्ली : राहुल गांधींना शेतीबद्दल काही माहिती नाही. पण मी एका शेतकरी महिलेच्या पोटी जन्म घेतला आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेऊ शकत नाही.” अशा शब्दात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी केलेल्या टीकेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पलटवार केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी प्रत्युतर दिलं. आंदोलन करणारे शेतकरी नक्षलवादी आणि खलिस्तानी असल्याचा आरोपावर राजनाथ सिंह म्हणाले,”शेतकऱ्यांविरुद्ध कुणीही असे आरोप करायला नको. शेतकऱ्यांविषयी आमच्या मनात असलेला आदर आम्ही व्यक्त करतो. आम्ही मान झूकवून शेतकऱ्यांना नमन करतो. ते आपले अन्नदाते आहेत,” असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

“राहुल गांधींना शेतीबद्दल काही माहिती नाही. राहुल गांधी माझ्यापेक्षा लहान आहेत आणि शेतीबद्दल मला त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. कारण मी एका शेतकरी महिलेच्या पोटी जन्म घेतला आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेऊ शकत नाही. आपले पंतप्रधानांनीही एका गरीब महिलेच्या पोटी जन्म घेतला आहे. मला इतकंच सांगायचं आहे, यापेक्षा जास्त सांगण्याची गरज नाही,” असं राजनाथ सिंह म्हणाले.

दरम्यान, राजधानी दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी गेल्या महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात देखील आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांवर खलिस्तानी व नक्षलवादी असल्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला होता. हे सरकार दोन तीन उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.