सगळ्यांना कोरोना लस देणं शक्य आहे का? पूनावाला म्हणतात…
देश बातमी

सगळ्यांना कोरोना लस देणं शक्य आहे का? पूनावाला म्हणतात…

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लसींचा तुटवडा निर्णाण होत असल्याचे दिसून येत आहे. अशात केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लसीचे डोस पुरवले जात नसल्याची तक्रार महाराष्ट्रासह काही राज्यांनी केली आहे. असे असताना सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी या मुद्द्यावर आपलं मत मांडलं आहे. देशात ज्या दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे, त्यापैकी सर्वाधिक डोस हे सीरम इन्स्टिट्युटने Astrazeneca आणि Oxford सोबत संयुक्तपणे उत्पादित केलेल्या Covishield लसीचे आहेत. त्यामुळे पूनावाला यांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या भारतात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. आत्ता सर्वांसाठी लस उपलब्ध करून देणं हे सोपं काम नाही, असं अदर पूनावाला इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत. आपल्याकडचं लसीचं उत्पादन आणि त्याची उपलब्धता लक्षात घेणं आवश्यक आहे. सगळ्यांना लस उपलब्ध करून दिली, तर ज्यांना लसीची सगळ्यात जास्त गरज आहे, त्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सगळ्यांना लस उपलब्ध करून देणं हे सोपं काम नाही, असं पूनावाला म्हणाले आहेत.

पूनावाला पुढे म्हणतात, ‘जर लस खुल्या बाजारात उपलब्ध करून दिली, तर त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं नुकसान होईल. सध्या तरी आमची प्राथमिकता भारतीयांना लस उपलब्ध करून देणे हीच आहे. सध्याच्या कमी किंमतीत लस उपलब्ध करून देण्यासंदर्भात भारत सरकारसोबत आम्ही सहमती दर्शवली आहे. या किंमती २ ते ३ महिन्यांसाठी असतील, असं देखील त्यांनी यावेळी नमूद केलं.